रत्नागिरी : जिल्ह्यातील गावोगावी घनकचरा, सांडपाणी प्रकल्प

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून निधीही दिला जात आहे, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत गावांची निवड करून त्या ठिकाणी प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांची कामे मार्गी लागल्यावर गावातील सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे गाव पातळीवरच व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, शाळा आणि अंगणवाडी येथे शौचालय सुविधा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या घटकांची अंमलबजावणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावोगावी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवले जाणार आहेत. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या सर्व गावातील गावातील प्रकल्पांच्या कामासाठी तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींमध्ये प्रकल्पांची कामे सुरू असून ४० टक्के ग्रामपंचयतींमध्ये प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रतिव्यक्ती ६० रुपये तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये निधी देण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५ हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला प्रतिव्यक्ती २८० रुपये तर त्याह्न अधिक लोकसंख्येच्या गावासाठी प्रतिव्यक्ती ६६० रुपये देण्यात येणार आहेत. ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे अशा गावांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी किमान ५० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी स्वच्छ भारत मिशन, पंधरावा वित्त आयोग आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शोषखड्डे, खतखड्डे, गांडूळखत…
नॅडेफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, मॅजिक पिट, तर सार्वजनिक स्तरावर स्थिरीकरण तलाव, पाझर खड्डे आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सांडपाणी घनकचरा प्रकल्पांतर्गत गावातील कचरा जमा करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड आणि मॅन्युअल सायकल दिली गेली आहे. गावातील प्लास्टिक कचरा एकत्र करण्यासाठी प्लास्टिक कलेक्शन युनिट उभारण्यात आली आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तालुकास्तरावर उभारण्यात येणाऱ्या प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 09/Dec/2024