खेड : तालुक्यातील लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाणी पाईपलाईन कोतवली येथील सोनपात्रा नदीजवळ कोकण रेल्वे पुलाजवळ तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा प्रयत्न झाल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली आहे. ६३० मि. मी व्यासाची ही पाईपलाईन अज्ञातांना फोडता आलेली नसली तरी झालेल्या प्रयत्नाने पाईपलाईनला गळती लागून ते पाणी खाडीत गेले आहे. हा प्रकार गांभीयनि घेत सीईटीपीसह एमआयडीसीने याप्रकरणी लोटे दुरक्षेत्रासह खेड पोलिस स्थानकात तक्रार अर्ज देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
खेड तालक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन त्यावर प्रक्रीया केली जाते. प्रक्रीयेनंतर ते सांडपाणी ६३० मि.मि. व्यासाच्या एच.डी.पी.ई. पाईपलाईनमधून लोटे ते करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात कि.मी.ची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. या पाईपाईनला अधूनमधून गळती लागते, गळतीनंतर त्याची एमआयडीसीकडून दुरुस्ती केली जाते. काही वेळेला गळती मानवनिर्मित तर काहीवेळेला ती तांत्रिक बिघाडामुळे होत असल्याचे नेहमी ऐकायला मिळते. मात्र मोठी पाईपलाईन तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा अथवा घाव घालून तोडण्याचा प्रयत्न हा प्रथमच झालेला असल्याने प्रशासकीय यंत्रणांनी तो गांभीर्याने घेतला आहे.
चार दिवसांपूर्वी कोतवलीत प्रदूषणाने मासे मृत झाल्याची तक्रार केली गेली होती. अशातच पाईप लाईनची देखभाल करणारे विजय जुवळे यांना हे गस्त घालत असताना रेल्वे पुलाजवळ अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण अवजाराच्या साहाय्याने पाईपलाईन कापण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. जुवळे यांनी याबाबती माहिती सीईटीपीसह एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिली. याबाबत पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 10/Dec/2024














