चिपळूण : खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग गेल्या काही वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित आहे. या परिसरात भौतिक सुविधांची वानवा आहे. काही वर्षांपूर्वी येथे बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला; मात्र हा टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय स्तरापर्यंत पत्रव्यवहार केला तरीही बीएसएनएलची सेवा सुरू झालेली नाही.
सह्याद्रीच्या टोकास वसलेला खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग. या परिसरातील गावे खेडपासून दूरवर असली तरी या परिसरातील ग्रामस्थांची नाळ चिपळूणशी जोडलेली आहे. शासकीय कामे वगळता व्यवसाय, नोकरी व बाजारपेठेत खरेदीसाठी येथील ग्रामस्थांना चिपळुणात धाव घ्यावी लागते. खेड तालुक्यातील आंबडसपर्यंत बीएसएनएलबी चांगली सेवा मिळते; मात्र पंधरागाव, काडवली, कुंभवली, मुसाड, वावे, चोरवणे, पोसरे आदी परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथील बीएसएनएलचा टॉवर बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरातील सर्वच गावात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे तर सध्या भारतांत सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाची संख्याही येथे जास्त पाहायला मिळते नोकरी, व्यवसायानिमित्ताने परगावी असलेल्या मुलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता येतो; मात्र ही सेवाच कोलमडल्याने संपर्काची साधनेच बंद झाली आहेत.
टॉवरचा विद्युतपुरवठा खंडित इाल्यास पर्यायी व्यवस्था नाही. महिन्यातून आठवडाभर तर ही यंत्रणा बंद राहते. याबाबत ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर लवकरच सेवा सुरू होईल, असे सांगण्यात येते; मात्र सेवा काही सुरू होत नाही. स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करतात म्हणून काही जागरूक माजी सैनिकांनी थेट केंद्र सरकारच्या मंत्रालयीन स्तरावर संपर्क साधला आहे. तरीही सेवेत बदल झालेला नाही.
मुसाड गावात बीएसएनएल नेटवर्क जवळपास पंधरा-वीस दिवसांपासून बंद आहे. महिन्यातून पाच-सहा दिवस टॉवर बंद असतो. शेजारी असेलल्या धामणंद येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावरती बीएसएनएलचा टॉवर आहे: परंतु तो अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये असतो. बीएसएनएल याकडे लक्ष देत नाही. प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु लक्ष दिले जात नाही. बाळकृष्ण सुर्वे, माजी सैनिक, मुसाड सुर्वेवाडी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 10/Dec/2024














