रत्नागिरी : सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांची भेट घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी त्यांना माहिती दिली आणि कारवाई करण्याची मागणी केली.
ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेसवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश श्री. ताम्हणकर यांनी दिले आहेत.
एस. टी. महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील गंभीर त्रुटींबाबत सुमारे दीड वर्षापूर्वी रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना पत्र दिले होते; यात जवळजवळ सर्व बसेसमध्ये आग विझवण्याचे संयंत्र नसल्याची बाब विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली होती; परंतु विभाग नियंत्रकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांना भेटून सर्व बसेसमधे आग विझवण्याचे संयंत्र नसल्याचे किंवा कालबाह्य असल्याबाबत कारवाई करण्याचे पत्र दिले.
तीन प्रवासी असणाऱ्या रिक्षावर संयंत्र नसेल, तर त्वरित कारवाई होते. मग बसेसवर का नाही, असा सवाल उपस्थित करत प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा बसेसवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेसवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले. या वेळी भाजपा पदाधिकारी प्रशांत सनगरे उपस्थित होते.
बसमधून प्रवास करताना त्या बसमध्ये आग विझवण्याचे संयंत्र नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन श्री. ताम्हणकर यांनी यावेळी केले. पत्राची दखल त्वरित घेतल्याबद्दल सतेज नलावडे यांनी ताम्हणकर यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 10-12-2024














