सोमेश्वर विश्वमंगल गोशाळेमध्ये १२ डिसेंबरला विशेष कार्यशाळा

रत्नागिरी : सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपीठ, विश्वमंगल गोशाळेमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये ही कार्यशाळा होईल.

यात मुंबईतील तज्ज्ञ विक्रांत वाड गो कास्ट, गो पावडर व गो फिनेल याविषयाची माहिती देऊन हे उत्पादन तयार करण्याची सोपी पद्धत शिकवणार आहेत. पंचगव्यापासून विविध वस्तू तयार करण्याचा विक्रांत वाड यांना गाढा अनुभव आहे. स्मिता वेंगुर्लेकर याही या कार्यशाळेमध्ये निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून सहभागी होणार आहेत. महिलांच्या विविध आजारांवर पंचगव्याद्वारे कोणते उपाय करता येतील, याची गेली वीस वर्षे ते त्या माहिती देत आहेत. या संदर्भातल्या कार्यशाळाही आयोजित करत आहेत. रत्नागिरी शहर परिसरामध्ये ज्या भटक्या गाई, गुरे, वासरे फिरत आहेत, त्यामुळे रत्नागिरीकरांना होणारा त्रास व मुक्या प्राण्यांचे होणारे हाल यामधून सुटका होण्यासाठी गेले वर्षभर रत्नागिरीजवळील सोमेश्वर गावी सोमेश्वर शांतीपीठामार्फत गोशाळा चालवली जात आहे. या गोशाळेमध्ये आता ५७ गाई-वासरे आहेत. रत्नागिरीकर दर रविवारी या गोशाळेमध्ये एकत्र येतात व श्रमदान करतात. विविध व्याख्याने या गोशाळेमार्फत राबवली जातात. त्याचप्रमाणे विविध कार्यशाळांचे आयोजन या गोशाळेमार्फत केले जाते.

गुरुवारी होणाऱ्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोमेश्वर शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 8999424706 किंवा 84594 93911 या फोन नंबरवर पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 10-12-2024