रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाला गती

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे क्रीडा संकुल उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असून, माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घातल्यामुळे त्यासाठी आवश्यक निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे हे काम गतीने सुरू झालेले आहे.

सर्व सोयीसुविधांनी युक्त असे रत्नागिरीतील एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ५ कोटी रुपये खर्च करुन, जिल्हा क्रीडा कार्यालयासाठी आवश्यक असणारी इमारत उभी करण्यात आली होती. त्यानंतर हे काम रखडले होते. इनडोअर स्टेडियम, ऑलिम्पिक दर्जाचे अॅथलेटीक्स ग्राऊंड, खेळाडूंसाठी वसतिगृह अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. परंतु निधी अभावी ही कामे रखडली होती. परंतु माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून इनडोअर स्टेडियमसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचे काम सुरु झाले आहे.

यासाठी सुमारे सात कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याठिकाणी खो-खो, कबड्डी सोबत बॅटमिंटन व अन्य स्पर्धाही होणार आहेत.

रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात कमी साधनसुविधा असतानाही या जिल्ह्याने चांगले खेळाडू दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्य स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपल्या खेळाचा ठसा उमटवून जिल्ह्याला खेळामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे. रत्नागिरीतील खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा संकुल उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसी येथे ११.५० एकर जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. सध्या याठिकाणी कार्यालय, चेंजिंग रूम्स असे एकूण ४ कोटी १६ लाखाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे.

सिंथेटिकची धावपट्टी उभारणार
इनडोअर स्टेडियमबरोबरच ऑलिम्पिक दर्जाचे अॅथलेटिक्ससाठी सिंथेटिमकची धावपट्टीही उभारली जाणार आहे. त्यामुळे तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांसह राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाही या ठिकाणी होऊ शकणार आहेत. याठिकाणी स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंच्या निवास व्यवस्थेसाठी वसतिगृह उभारले जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 10/Dec/2024