तीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध

चिपळूण : तब्बल तीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता वेध लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नगर पालिका, महानगरपालिका तर त्याच्या पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेते ठरले, कार्यकत्यांची वेळ आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढणार की स्वबळावर निवडणुका होणार, याचा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका महायुती, महाआघाडीच्या माध्यमातून लढली जाते. त्या माध्यमातून खासदार, आमदार निवडला जातो. या निवडणुकांसाठी अनेक पक्ष एकत्र येतात आणि आपली राजकीय ताकद उभी करतात. मात्र, ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्यावेळी विविध पक्षांचे नेते स्वबळाचा नारा देतात. ग्रामीण भागात पक्ष रूजला पाहिजे. पक्षाचे अस्तित्त्व दिसले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वपक्षाचे सदस्य हवेत, अशी कारणे पुढे करून कार्यकत्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घाट घातला जातो आणि यामध्ये पाडापाडीचे राजकारण देखील होते, असा आजवरचा अनुभव आहे. लवकरच नगरपालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. खरेतर या निवडणुकांची तयारी अनेक उमेदवारांनी आधीच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतच केली आहे. या निवडणुकांवेळी अशा इच्छुकांनी निवडणूक प्रचार आपल्या मतदारसंघातच केला आणि आपली ताकत आजमावली. आता नेत्यांचे भवितव्य नक्की झाले आहे. मात्र, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणाला नगरसेवक, कोणाला जि. प., पं. स. सदस्य व्हायचे आहे.

सद्यस्थितीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असे चित्र आहे. मात्र, ही आघाडी किंवा युती फिस्कटली तर सहा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सहा उमेदवारांमध्ये लढत होऊ शकते. या शिवाय अपक्ष, बंडखोर उमेदवार देखील रिंगणात राहाणार असल्याने उमेदवारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. अनेकांनी आत्तापासूनच या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघात इच्छुकांनी लक्ष केंद्रीत केले. प्रत्येक घरात संपर्क केला आणि मते मिळविण्याचा प्रयत्न झाला, मात्र, या पुढची निवडणूक स्वतः साठी लढण्याची असल्याने आत्तापासूनच इच्छुक उमेदवार वॉर्डात फिरू लागले आहेत, त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी नेते एकत्र येतील की नेतेही स्वबळाचीच भाषा करतील, या बाबत उत्सुकता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 10/Dec/2024