चिपळूण : अध्ययन आणि अध्यापन हेच ध्येय, जीवननिष्ठा असलेल्या मालघरचे रामभाऊ साठे यांची साठे सर हीच खरी ओळख. कोकणात सत्तरच्या दशकापासून शिक्षणक्षेत्रात काम करत असताना द्रष्टेपणाने विविध उपक्रम राबवून हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारकाच्या संग्रहालयाला अशा गुरुजींचे नाव देण्याचा निर्णय घेतला याबद्दल आम्ही साठे कुटुंबीय ऋणी आहोत, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद साठे यांनी केले. संग्रहालय पुन्हा उभारण्याचे व्रत घेतले आहे त्याला पाठबळ मिळाले. आम्ही उतणार नाही, मातणार नाही, अशी ग्वाही लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी दिली.
मालघर येथे रविवारी (ता. ८) रामभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करून लोटिस्माने ते स्वीकारण्याचा समारंभ साठे सरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पार पडला. त्या वेळी साठे सर यांचे चिरंजीव आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळवणारे मिलिंद साठे यांनी सांगितले की, त्यांनी बीएस्सी बी. टी. पदवी मुंबईत घेतली. त्यानंतर मंत्रालयात नोकरीत असताना ते उच्च पदापर्यंत गेले असतेच; परंतु स्वर्गीय तात्या नातूंच्या हाकेला ओ देऊन ते कोकणात परतले आणि शिक्षणक्षेत्राला त्यांनी वाहून घेतले. अध्ययन आणि अध्यापन हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांनी शिकवणी घेतली नाही; मात्र शिकवणे कधी सोडले नाही. रात्रीही शिकायला घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवायचे. प्रास्ताविकात सरांच्या कन्या संध्या साठे-जोशी यांनी सांगितले की, भाऊंनी बिया पेरायला विद्यार्थ्यांना शिकवले आणि स्वतः विद्यार्थी पेरले. त्याचे मोठमोठे वृक्ष म्हणजेच आजचे विविध क्षेत्रात तळपणारे त्यांचे विद्यार्थी होत. मनोहर वाजे म्हणाले, साठे सर आमचे गुरूजी होतेच.
शाळा संपल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांचे ते गुरू झाले. माजी आमदार विनय नातू, शिरीष दामले, केळकर मॅडम यांनीही भाऊंच्या आठवणी जागवल्या. सुनील टेरवकर यांनी सूत्रसंचालन केले.
नावीन्यपूर्ण असे उपक्रम
औपचारिक शिक्षणाच्या जोडीला त्यांनी त्या काळात नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबवले. ते मुलांना शेती करायला पाठवायचे. मुलांकडून जलसंवर्धनासाठी बंधारा बांधून घ्यायचे. मुलांना खुंटी कलम शिकवायचे. प्रत्येक मुलाच्या घरी किमान एककलम या पद्धतीने लावलेले आहे. काळाच्या पुढे त्यांची दृष्टी होती आणि ती फक्त गुरुजींची नव्हती तर गुरूंची होती, असे डॉ. साठे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 10/Dec/2024














