लांजा : लांजा बसस्थानकाच्या कामाला चार बर्षे झाली तरी गती मिळत नाही. स्थानकाचे काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी कॉक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात धूळ साठल्याने धुळीचा त्रास प्रवासी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात साठलेल्या धुळीकडे एसटी प्रशासनाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बस स्थानकासमोरील कॉक्रिटीकरणाचे काम अगदी गाजावाजा करत झाले. मात्र, प्रवासी जनतेला धुळीच्या त्रासापासून मुक्तता कधी मिळणार, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जातो आहे. या धुळीच्या लोटामुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, संबंधित यंत्रणेकडून प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लांजा बसस्थानकाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली अहे. बसस्थानकातील खड्यामुळे प्रवासी व एसटी चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. दरम्यान, नागरिकांनी या बसस्थानकाच्या दुरवस्थेची माहिती आ. किरण सामंत यांना देण्यात आली. त्यांच्या पुढाकाराने लांजा बसस्थानकाचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाला गेले आणि लांजा बसस्थानक खड्डेमुक्त झाले.
मात्र, कॉक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. नागरिकांना धुळीपासून मुक्तता मिळावी व लांजा बस स्थानक आवार स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
बसस्थानकात उभे राहणेही
कठीण कॉक्रिटीकरण होऊन आठ महिने झाले असून, बसस्थानकाच्या आवारात कॉक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा त्रास शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवासी, नागरिकांना सहन करावा लागत आहे. बस स्थानकात बस आल्यानंतर हवेद्वारे धुळीचे लोट पसरत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात उभे राहणे मुश्किल होऊन बसले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 10/Dec/2024














