गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील रमणीय किनाऱ्यावर सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. गणेश मंदिराच्या नजीकच कासवांच्या अंड्यांसाठी संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १६ किनाऱ्यांवर सागरी संरक्षण व संवर्धन हा उपक्रम कांदळवन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी कासव मित्रांची निवड करण्यात आली असून, गणपतीपुळेसाठी ऋषिकेश जोशी कासव मित्र म्हणून काम करणार आहेत. मालगुंडसाठी आदित्य मयेकर कासवमित्र म्हणून काम करणार आहेत. यापूर्वी हे काम वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे होते; मात्र त्यानंतर आता सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाकडे देण्यात आले आहे.
गणपतीपुळे येथे उभारण्यात आलेल्या या केंद्रात सागरी कासवांची अंडी ठेवली जाणार आहेत. ४५ ते ५५ दिवसांत अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले समुद्रापासून १५ ते २० मीटर अंतरावर सोडली जातात. यानंतर ती समुद्राच्या दिशेने चालत जातात, अशी माहिती कांदळवन विभागाची वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकूर यांनी दिली.
अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारणी
हिवाळ्यात डिसेंबर ते पुढे चार महिने कासवांचा अंडी देण्याचा हंगाम असतो. भटकी कुत्री आणि काही वेळेस मानवांकडूनही या अंड्यांचे नुकसान होते. या अंड्यांना सुरक्षितता लाभावी यासाठी संवर्धन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे कासवांची पिल्ले तयार होऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 10/Dec/2024














