लांजा : तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू नये यासाठी पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहे पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने २०१४-२५ या वर्षाकरिता संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही. तत्पूर्वीच, पंचायत समिती विभागाने ६०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये लवकरच एक बैठक होणार आहे. त्यात लांजा तालुक्यातील टंचाईीरस्त गावांना मागणीनुसार पाणीपुरवठा नियोजन केले जाईल.
तर फेब्रुवारी-मार्चमध्ये पाणीटंचाईचे स्वरूप तीव्र होते. दुर्गम भागात गावात सर्वप्रथम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. यंदा उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने आतापासूनच वनराई बंधारे बांधण्यास सुरवात केली आहे. तालुक्यात एकूण ६०० बंधारे बांधण्यात येणार आहेत.
आतापर्यंत १७५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींना १० बंधारे बंधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. लोकसहभाग आणि श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात येत आहेत. तालुक्यात अतिदुर्गम भागातील गावात टंचाईची झळा अधिक पोहोचते त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये बंधारे आणि कयाने जलस्रोत बांधण्यात आल्यामुळे टंचाईग्रस्त गावे कमी झाली होती. तालुक्यात ४४ गावांतील ९८ वाड्या तहानलेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी १२६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. बंधारे मोहिमेमुळे यंदाही टंचाई तीव्रता कमी राहील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा
अभियानांतर्गत तालुक्यात २०२४ व २५ वर्षासाठी पंचायत समितीकडून ६०० बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश पाणीटंचाईवर मात होणार आहे. या बंधारे बांधण्याकामी ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, बचतगट महिला, अंगणवाडी कर्मचारी, स्थानिक नागरिक, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, व कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग असून बंधारे बांधणीसाठी मेहनत घेत आहेत. संतोष म्हेत्रे, गटविकास अधिकारी, लांजा
टंचाई कृती आराखडा बैठक झालेली नाही
पाणीटंचाईग्रस्त गाव व त्यामधील वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, जलसाठ्यात वाढ करणे, विहिरी दुरुस्ती करणे, नळपाणी योजना दुरुस्ती, विहिरीचा गाळ उपसा करणे, बंधारे बांधणे आदीविषयी चर्चा करून तालुक्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा केला जातो. त्यासह टंचाईग्रस्त गावे व वाड्यांनी प्रस्ताव देण्याच्या सूचना करण्यात येतात. संभाव्य आराखड्यामध्ये अंदाजे रक्कम ठरवून तसा कृती आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येतो. मात्र, पाणीटंचाई कृती आराखडा बैठक न झाल्याने तत्पूर्वी प्रशासनाने बंधारे बांधणे मोहीम हाती घेतली आहे.
पूर्व भागातील गावांवर टंचाईचे संकट
तालुक्यातील दुर्गम भागापैकी पालू, कोचरी, रिंगणे, कणगवली, वाडगाव, गोळवशी, विवली, कोडगे, रुण, इसवली, पनोरे, वाकेड, आंजणारी, कुरंग या भागातून पाण्याची टंचाई लवकर भासते. यावर्षी लांजा पूर्व भागातील पाण्याच्या जलसाठ्यांची पाणीपातळी कमी होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे तिकडे पाणीटंचाई लवकर जाणवण्याची शक्यता आहे. चिंचुर्टी धावडेवाडी व पालू गावात लवकर टँकर सुरू करावे लागतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 10/Dec/2024














