संगमेश्वर : संगमेश्वर ते कोल्हापूर राज्यमार्गावरील करंबेळे मैल ते महाडिक थांबादरम्यानचा रस्ता कापण्यात आल्यामुळे राज्यमार्ग धोकादायक बनलेला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरकडे जाणारा हा जवळचा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून धावतात. करंबेळे येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्याचे देवरूख हे शासकीय कार्यालय असल्यामुळे ग्रामस्थ तसेच पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग देवरूखकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. याच मार्गावर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी ये-जा करण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात; मात्र या मार्गावर करंबेळे मैल ते महाडिक थांब्यापर्यंत रस्ताच कापला गेल्यामुळे अपघात घडत आहेत. या रस्त्याची चाळण झाली असून, रस्त्याच्या बाजूला हा मार्ग धोकादायक बनलेला आहे तसेच घाटरस्त्यावर संरक्षक कठडे तुटल्यामुळे गाड्यांचे अपघातही होत आहेत. त्यामध्ये अनेकजणं जखमी झाले असून, काहींना मृत्यूलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे. करंबळे घाटामध्ये दरड कोसळत असताना बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भविष्यात अपघात घडल्यास बांधकाम विभाग याला जबाबदार राहील, असे प्रवाशांनी सांगितले.
वाहनांची संख्या वाढतेय
कोल्हापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे करंबेळे मैल ते महाडिक थांबा या भागातून वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांची कसरत होते. या गोंधळातच अपघात घडत आहेत. सध्या महामार्ग चौपदरीकरणाची कामे सुरू असल्यामुळे वाहनांची संख्या गेल्या काही दिवसांत अधिक वाढलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 10/Dec/2024














