रत्नागिरी: अण्णा जाधव हल्ला प्रकरण: आणखी पाच जण रडारवर..

गुहागर : वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास ऊर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झाला, त्याला राजकीय पार्श्वभूमी होती की पूर्ववैमनस्यातून घडवून आणण्यात आला अशा प्रश्नांची उकल लवकरच पोलिस तपासातून होणार आहे. तसेच या प्रकरणात आणखी पाच जणांचा शोध पोलिस करीत आहेत.

वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान कळंबट गावातील बौद्ध समाजावर अन्याय झाल्याचा विषय उचलून धरला होता. ऐन निवडणुकीत विकास जाधव यांनी कळंबट येथील घटनेवरून महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांना लक्ष्य बनविले होते, त्यानंतर १७ नोव्हेंबरला नरवण येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले असता त्यांच्यावर हल्ला झाला. जाधव यांच्यावरील हल्ल्याचा तपास करताना पोलिसांनी अनेक ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर विविध मोबाईलचे टॉवर लोकेशन, संशयितांचे संभाषण आदी तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले. त्यामधून संभाव्य संशयितांची यादी बनवून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. या तपासातून अनुप नारायण जाधव (रा. नारायण पॅलेस, राऊत चाळ जवळ, बदलापूर) आणि कुणाल किसन जुगे (रा. अण्णा पाटील नगर, शिवानंद मठ शेजारी, अंबरनाथ पश्चिम) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बदलापूर व अंबरनाथ येथून त्या दोघांना ८ डिसेंबरला अटक केली. या गुन्ह्यामध्ये आणखी पाच संशयितांचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 11/Dec/2024