दापोली पर्यटन क्षेत्रातील व्यवसायात स्थानिक मागेच

दापोली : दापोली तालुक्याचे पर्यटन झपाट्याने वाढत असून रोजची पर्यटन क्षेत्रातील उलाढाल ही कित्येक लाखात आहे. त्यामुळे येथील जागेला सोन्याचा दर आला आहे. कोट्यवधी रुपये टाकून इथे जागा खरेदी करून हॉटेल्स उभारले जात आहेत. डोळ्यासमोर समुद्र आणि सभोवतालचे विलोभनीय दृष्य यामुळे जागामालक म्हणेल त्या किमतीत जागा खरेदी केल्या जात आहेत. त्याच कारणाने येथील फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक हे अन्य राज्यांतील तसेच अन्य जिल्ह्यातील आहेत. तालुक्यांत होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील जागा विक्रीमुळे पर्यटन क्षेत्रातही स्थानिक लोक पर्यटन व्यवसायात मागेच दिसत आहे.

काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या स्थानिक लोकांचे पर्यटन क्षेत्रातील पर्यटन व्यवसाय वगळता, घरगुती खानावळ, टपरी इथपर्यंतच स्थानिक व्यावसायिकांची मजल दिसते. दापोली तालुक्याला केळशी ते दाभोळ अशी समुद्र किनाऱ्याची देणगी लाभली आहे. हंगामाच्या कालावधीत जरी पर्यटन व्यवसाय केला तरी वर्षभराची कमाई या पर्यटन व्यवसायातून होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. पर्यटनामुळे रोजचे खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. केळशी, पाळंदे, मुरुड, कर्दे, लाडघर, दाभोळ, समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे येथे पर्यटन व्यवसायाला अधिक चाव असून अनेकांचा जागा खरेदीचा कल दापोलीत वाढला आहे.

या दोन तीन वर्षात दापोलीत किनाऱ्याच्या मोक्याच्या जागा विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायात अन्य राज्यातील आणि अन्य जिल्ह्यातील व्यावसायिकांची अधिक भर पडली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायात स्थानिकांच्या हाताला काम ही संकल्पना आगामी काळात मागे पडेल, असे दिसत आहे.

विकला जातोय पर्यटन तालुका
तालुक्यात पर्यटन वाढत आहे, तर आर्थिक उलाढाल देखील वाढत आहे. मात्र, पर्यटन क्षेत्रातील जागेच्या वाढत्या किमती पाहता सामान्य माणसाला पर्यटन क्षेत्रात जागा विकत घेऊन पर्यटन व्यवसाय करणे आता तितकेसे शक्य नाही. – राकेश पालटे, लाडपर-दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 11/Dec/2024