लांजात विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षेचे प्रशिक्षण

लांजा : न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे मंगळवारी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) अर्थात आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम पार पडला.

यासाठी शालेय आपत्ती प्रशिक्षण व निवारण एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक महंमद रखांगी, गट शिक्षणाधिकारी विनोद सावंग, केंद्र प्रमुख चंद्रकांत पावसकर, लांजा पोलिस उपनिरीक्षक अमोद सांगले, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पाटोळे आदी उपस्थित होते.

कोकण प्रदेश दऱ्या-खोऱ्यांचा, समुद्र भू भागाचा आहे. कोकण भागात नैसर्गिक आपत्ती जास्त नसली, तरीही येथील युवकांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण काळाची गरज असल्याने केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे येथील टीम शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. मंगळवारी लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पूर, चक्रीवादळ, भूकंप, भूस्खलन, इमारत कोसळणे, रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक आपत्तींसह विविध आपत्तींना प्रतिसाद, धोके ओळखावे, जोखीम पातळीचे मूल्यांकन करणे, चेतावणी प्रसारित करणे आणि संघ तयार करणे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना प्रतिसाद कसे देता येईल, याबाबत प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीममध्ये पार्टी कमांडर प्रमोद रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू जवान सचिन मोरे, शाम फापले, संदीप खुटवड, प्रवीण हिवराळे, नवनाथ गिरे, महिला जवान कविता ढवळे, ज्यूनम्युन आदी सहभागी झाले होते.

पाचशेहून अधिक शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतला. लांजा हायस्कूल येथे मंगळवारी दिवसभर हे प्रशिक्षण सुरू होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 11/Dec/2024