बांगला देशात हिंदूंवर अत्याचार; मंडणगडमध्ये ‘विहिंप’चा जनआक्रोश मोर्चा

मंडणगड : बांगला देश येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी व तेथील अत्याचारी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी मंडणगड येथे विश्वहिंदू परिषदेच्या वतीने बांगला देश हिंदू न्याय यात्रेअंतर्गत आयोजित केलेला जनआक्रोश मोर्चा तहसील कार्यालय येथे धडकला. यात जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध ठिकाणी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 10 वाजता शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या परिसरात यात्रेस सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव-भगिनींनी या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारीदेखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामधील बांगला देश निषेधाच्या, हिंदू एकतेच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय… आदी घोषणांनी शहर परिसर दणाणून निघाला.

यावेळी तहसील कार्यालय भिंगळोली येथील मैदानात आयोजित सभेत बांगला देशमध्ये राहत असलेल्या हिंदूंवर असामाजिक तत्त्वांकडून अत्याचार केले जात आहेत. याचा आक्रोश संपूर्ण जगात व्यक्त होत आहे. आज तमाम हिंदू बांधव-भगिनींनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा करण्याची, जागरूक होण्याची गरज असल्याचे मत प्रमुख वक्त्यांनी व्यक्त करत जनतेला आपल्याला आपल्या धर्माचे संरक्षण करण्याकरिता सतर्क राहण्याचे आवाहन केले. यानिमित्ताने शहर व्यापारी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी दोन तास बाजारपेठ बंदची हाकही देण्यात आली होती.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे हेमंत भागवत, प्रमोद काटकर, सुनील मेहता, राजू चव्हाण, सचिन शेठ, भाजपचे तालुकाध्यक्ष आप्पा मोरे, माजी सभापती आदेश केणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक दिनेश लेंडे, उद्योजक दीपक घोसाळकर, सचिन थोरे, अस्मिता सोमण, वैशाली रेगे यांच्यासह हजारोच्या संख्येने हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 11-12-2024