आ. किरण सामंत यांच्या सूचनेने राजापूर शहरातील पथदीप अखेर सुरू

राजापूर : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने शहरातील काही भागातील पथदीपांचा वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारीही केल्या. याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला आणि वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याची महावितरणने तातडीने अंमलबजावणी केली.

त्यामुळे राजापुरातील रस्ते पुन्हा एकदा पथदीपांच्या प्रकाशाने उजळले, राजापूर नगरपालिकेच्या वतीने व्यवस्थापन सांभाळल्या जाणाऱ्या शहरातील पथदीपांचे गेल्या पाच-सहा महिन्यांचे लाखोंचे बिल थकले होते.

आचारसंहिता आणि वारंवार होणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे बिलाचा धनादेश केवायसी प्रक्रियेत अडकला होता. स्ट्रीटलाईटचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागला होता. पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी प्रभारी मुख्याधिकारी तुषार बाबर, चेतन विसपुते यांच्याशी चर्चा करून नूतन आमदार सामंत यांच्याशी चर्चा केली तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार सामंत यांच्यापुढे हा प्रश्न मांडला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणने तत्काळ वीजपुरवठा सुरू केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 11/Dec/2024