खेड : शिशू आणि बाल वर्गातील मुलांची मस्ती हा घरोघरी कटकटीचा विषय मानला जातो, पण याच मुलांनी बेडूक उड्या मारून दोन दिवसांच्या क्रीडा महोत्सवात मोठी धमाल आणली.
खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील नूतन प्राथमिक विद्या मंदिरात ही धमाल विद्यार्थी शिक्षक आणि पाहुण्यांनीही अनुभवली.
लोटे येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळातर्फे घाणेखुंट येथे नूतन प्राथमिक विद्यामंदिर चालविले जाते. या विद्यामंदिराचा दोन दिवसांचा पहिला क्रीडा महोत्सव पार पडला. आज त्याचा समारोप झाला. अत्यंत आनंदात आणि उत्साहात झालेल्या या महोत्सवात छोट्या आणि मोठ्या शिशुवर्गापासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कबड्डी, लंगडीसारखे सांघिक खेळ, तर धावणे, चमचा लिंबू अशा व्यक्तिगत खेळांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वच मुलांचा क्रीडा महोत्सवातला उत्साह प्रफुल्लित करणार होता. मात्र छोट्या आणि मोठ्या शिशू वर्गातील मुलांनी महोत्सवात धमाल उडवून दिली. बेडूक उड्या, चमचा लिंबू तसेच धावण्याच्या क्रीडा प्रकारातही त्यांनी खूपच आनंदाने सहभाग घेतला. मुले मस्ती करतात, म्हणून घरी त्यांना धाकात ठेवले जाते. पण धावणे, उड्या मारणे हा मुलांचा आनंदच असतो. तोच त्यांना शाळेत अनुभवता आल्यामुळे त्यांनी उत्साहाने त्यात सहभाग घेतला आणि महोत्सव आनंदित करून टाकला.
संस्थेचे अध्यक्ष नारायण पवार, संदीप घाग, नामदेव घाग, अनंत घाग हे शिक्षक तसेच मुख्याध्यापक विजय बसवंत, प्राथमिक विभागाचे प्रमुख नितीन जाधव, माता पालक संघाच्या सदस्य अनुराधा खताते, कबड्डीचे पंच भोसले खसासे, महाडिक, तुळसणकर, गुणलेखक सागवेकर, सिद्धी, लंगडीच्या पंच बने, घाडगे, गुणलेखक धापसे मॅडम महोत्सवात आपापली जबाबदारी पार पाडत होते. देसाई आणि चाळके यांनी विद्यार्थ्यांची पाण्याची व्यवस्था केली. पालक मयूर खताते, सौ. अनुराधा खताते यांनी सर्व मुलांना आणि शिक्षकांना शीतपेयांचे वाटप केले. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिक्षक संजय भोकरे यांनीही मुलांना प्रोत्साहन दिले.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवंत, तसेच पालकही उपस्थित होते. अंकुश पेवेकर, अनिल कदम, मनीष कांबळे या पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि शिक्षकांना शीतपेयांचे वाटप केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 11-12-2024














