आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन एसटी बसस्थानकाचे रूपडे आता बदलणार आहे. या एसटी बसस्थानकातील खराब परिसर, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून होणारा त्रास अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.
माखजन विभागातील प्रवासी जनतेने ही समस्या आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे त्यांनी तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार निकम यांच्या चर्चा आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) फंडातून रुपये १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आता या निधीच्या सहाय्याने बसस्थानकाचे सुशोभीकरण सुरू झाले असून, परिसरात दर्जेदार दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे माखजन एसटी बसस्थानकाचा कायापालट होणार आहे.
काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे तसेच माजी मंत्री आमदार उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. ग्रामस्थांनी या निर्णयाचे कौतुक करत म्हटले, आमच्या मागणीवर तत्काळ कार्यवाही होऊन निधी मंजूर होणे ही आमदार निकम व तत्कालीन आमदार उदय सामंत यांच्या कामाच्या शैलीची ताकद आहे. माखजन एसटी बसस्थानक हा परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. याचे काम वेळेत व चांगल्या प्रतीचे होईल, असे सांगत आमदार शेखर निकम यांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 11/Dec/2024









