रत्नागिरी : जनतेला मी एकही खोटे आश्वासन दिलेले नाही. जी कामे सांगितली ती सुरू आहेत. विकासकामांचा शब्द दिला आहे, तो मी पूर्ण करणार आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण होतील, असा विश्वास माजी पालकमंत्री आणि आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला. भाजप मित्र पक्षाने लक्षात ठेवावे आपण सरकारमध्ये आहोत. एखादे काम माझ्याकडे किंवा भैयाकडे येऊन झाले नाही, तर टोकाची भूमिका घ्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले की, माझ्या शिवसैनिकांनी भाजप, राष्ट्रवादी आणि हितचिंतकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महायुतीने प्रामाणिक काम केले म्हणून आम्ही निवडून आले. गुहागरमध्ये विरोधक पन्नास हजारांच्या फरकाने निवडून येतील, असे बोलले जात होते. परंतु तिथेही राजेश बेंडल यांचा घासून पराभव झाला. योगेश कदम चांगल्या फरकाने विजयी झाले. महायुतील भाजपने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले, जनतेने स्वीकारले म्हणून आम्ही विजयी झालो. मी आजवर एकही खोटे आश्वासन दिलेले नाही. जी कामे सांगितली ती सुरू असून लवकरच पूर्ण होतील.
थ्रीडी मल्टिमीडिया शो, शिवसृष्टी, बसस्थानक, काँक्रिटीकरण सुरू आहे. मच्छीमारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. विविध ठिकाणी जेटीची कामे सुरू आहेत. मिरकरवाडा टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे. क्रीडा संकुलाचे काम वेगाने सुरू आहे. प्रगतिपथावर असलेली ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीत 5 एकर जागा दिली आहे. तरी भाजपच्या पदाधिकार्यांनी घनकचर्याबाबत पालिकेला निवेदन दिले. एखादं काम माझ्याकडे, भैयाकडे येऊन झाले नाही, तर त्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, सरकार आपले आहे, असे आ. सामंत यांनी सांगितले.
उबाठा शिवसेनेमध्ये जोरदार कलह सुरू आहे. या कलहाची चर्चा मुंबईपर्यंत आहे. परंतु कोणी कोणाला मतदान केले हे देवाजवळ जाऊन खरे-खोटे करणे योग्य नाही. ज्यांना योग्य वाटले त्यांनी मला मतदान केले. ज्यांना योग्य वाटले नाही त्यांनी समोरच्याला मतदान केले. परंतु निवडणुकीत कुणी कुणाला मतदान केले यासाठी गार्हाणे घालणे योग्य नाही. निवडणुकीतील अपयशाबद्धल शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना वारंवार टार्गेट केले जात आहे, या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, विलास चाळके हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. परंतु त्यांनी कडवटपणाने निवडणूक लढली. तरी त्यांना असा त्रास होत असेल, तर त्यांनी वैयक्तिक निर्णय घ्यावा, चांगला निर्णय पत्करावा, असा सल्लाही सामंत यांनी दिला.
भैयांच्या कामाचा वेग बुलेट ट्रेनसारखा राहील
लांजा राजापूरला जेव्हा किरणभैया आमदार नव्हते तेव्हा तेथील आमदारापेक्षा चौपटीने ते काम करत होते. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पाणी योजना आदीवर त्यांनी काम केले. आता तर ते आमदार झाले आहेत. त्यांच्या कामाचा वेग बुलेट ट्रेनसारखा राहील. भविष्यात दोन्ही मतदारसंघांत चौपटीने कामे वाढतील. पक्ष संघटना मजबूत होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 11-12-2024














