महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काँग्रेसची हिटलरशाही : उदय सामंत

रत्नागिरी : महाराष्ट्र एकीकरण समितीचा सीमाभागात फार मोठा मेळावा झाला; परंतु कर्नाटकच्या काँग्रेसच्या सरकारने महाराष्ट्रातील खासदार, आमदारांना या मेळाव्यात येण्यास बंदी घातली. काँग्रेस सरकार मराठी बांधवांवर अत्याचार करत आहे. काँग्रेसची तिथे हिटलरशाही सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि आमदार उदय सामंत यांनी केला आहे.

रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार किरण सामंत, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, आदी उपस्थित होते. आमदार सामंत म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमाभागात ८६८ गावे आहेत. या सीमाभागातील मराठी माणसाला ताकद देण्याचे काम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोट्यवधीच्या पाणी योजना मंजूर केल्या आहेत. त्यापूर्वी ठाकरे सरकराने बंद केलेले मराठी संस्थांचे अनुदान सुरू करण्यात आले आहे. याचा अर्थ आम्ही सीमाभागातील मराठी माणसांसाठी काम करतो, हे सिद्ध झाले आहे. मी उद्योगमंत्री असताना १७०० मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला; परंतु जे घडले नाही त्याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी पत्र देत असतील तर त्याचा काही उपयोग नाही. काँग्रेस सरकार मराठी बांधवांवर अत्याचार करत आहे; परंतु त्या मराठी बांधवांच्या मागे महाराष्ट्र सरकार ठाम उभे आहे.

ते म्हणाले, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महाविकास आघाडीला अपयश आले म्हणून नेतृत्व करण्यास राहुल गांधी कमकुवत आहेत, असा सर्वांचा समज झाला आहे. म्हणूनच शरद पवार यांनी ममता बॅनर्जीकडे नेतृत्व देण्याबाबत संकेत दिले. हा राहुल गांधी आणि काँग्रेसचा अपमान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 11/Dec/2024