रत्नागिरी : केंद्रात मोदी सत्तेत आल्यानंतर ज्यापद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवला तसाच धडा आता बांगलादेशला शिकवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशलाही आता भारताने जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी केली आहे. लवकरच केंद्राकडे तशी मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बांगलादेशात सध्या मोठा हिंसाचार सुरू आहे. त्याठिकाणी भारतीय नागरिकांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांक जमातीवर हे जीवघेणे हल्ले सुरू असून मानवतेला काळीमा फासणार्या घटना सध्या बांगलादेशात घडत आहेत. भारतीय नागरिकांवर होणारे हल्ले याविरोधात आता हिंदू एकवटला असून राज्यात सर्वत्र निदर्शने, मोर्च सुरू झाले आहेत. रत्नागिरीतदेखील मोठ्याप्रमाणात निदर्शने करण्यात आली.
हिंदू जनजागृती समितीच्यावतीने ही निदर्शने आयोजित केली होती. यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. आमदार उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीदेखील उपस्थिती दाखवून बांगलादेशात घडणार्या घटनांचा निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना आमदार उदय सामंत म्हणाले की, बांगलादेशला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केंद्रात मोदी सत्तेत आल्यानंतर ज्यापद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवला त्यापद्धतीनेच आता बांगलादेशला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केवळ निदर्शने करून स्वस्थ बसायचे नाही तर केंद्राकडे तशी मागणी होण्याची गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ती मागणी करूया, असे आवाहन आ. सामंत यांनी केले.
यावेळी ‘जय श्री राम’च्या घोषणांनी जयस्तंभ परिसर दणाणून गेला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आ. उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 11-12-2024














