मनोज सुतारांनी रेखाटलेल्या कोकणातील कलाकृतींचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

संगमेश्वर : कोकणच्या निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे कबनूर इचलकरंजी येथील चित्रकार मनोज सुतार यांच्या चित्रांचे मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत १५ डिसेंबरपर्यंत प्रतिबिंब या नावाने प्रदर्शन भरवले आहे. या कलाकृर्तीमध्ये कोकणातील कलाकृतींचाही समावेश आहे.

जहांगीर आर्ट गॅलरी येथे रिफ्लेक्शन या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गिरगाव आर्ट कॉलेजचे प्रा. महावीर पाटील, जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव श्रीमती मेनन आदीच्या उपस्थितीत झाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. चित्रकार मनोज सुतार संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णु परीट यांना गुरुस्थानी मानतात. परीट यांच्याकडे चित्र रेखाटनाच्या निमित्ताने आल्यानंतर सुतार यांना कोकणचा निसर्ग नेहमीच साद घालत असे. परीट आणि सुतार यांनी अनेकदा हा सर्वांगसुंदर निसर्ग आपल्या कुंचल्यातून हुबेहूब साकारला आहे. यातूनच चित्रकार सुतार यांना जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्याची उर्मी निर्माण झाली.

या कलाकृतींमधून केवळ दृश्यानंद नव्हे तर अंतर्मनाशी संवाद साधण्याची अनुभूती मिळेल. यामध्ये आपण आपल्या अंतर्मनाला सामोरे जाण्याची आणि जगाला एका नवीन दृष्टीने पाहण्याची संधी मिळवू, अशा भावना इचलकरंजीतील चित्रकार सुतार यांनी व्यक्त केल्या आहेत.

कला ही मनाच्या गाभ्याचा आरसा असते जी मानवी भावना, विचार आणि अनुभव यांचे प्रतिबिंब दाखवते. रिफ्लेक्शन या संकल्पनेवर आधारित हे चित्रकला प्रदर्शन आपल्याला स्वतःकडे, समाजाकडे आणि निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी देते. प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त झालेल्या प्रतिबिंबांचा अर्थ शोधणे म्हणजे आपल्याच मनाचा शोध घेणे. या प्रदर्शनातील चित्रांमध्ये पाण्यावरील प्रतिबिंबांपासून अंतर्मनातील विचारांपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपांतील प्रतिबिंब मांडली आहेत. -मनोज सुतार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 11/Dec/2024