साडवली : पाटगाव येथे उभारण्यात येणारे महावितरणचे खांब रस्त्याजवळ उभारू नयेत, अशी मागणी उबाठा शिवसेनेचे अजित गवाणकर यांनी केली होती; मात्र महावितरणने रस्त्याच्या बाजूपट्टीतच हे खांब उभे केले आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी घेतली की, नाही याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
देवरूख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव येथे महावितरणतर्फे विद्युतखांब उभारले जात आहेत. ते खांब रस्त्याजवळ न उभारता बाजूपट्टी व गटार सोडून उभारण्यात यावेत, अशी मागणी अजित उर्फ छोट्या गवाणकर यांनी महावितरणकडे केली होती. देवरूख ते पांगरी रस्ता हा चांगला झाल्यामुळे या मार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. या मार्गावर दुचाकींचे अनेक अपघात झाले आहेत. महावितरणच्या पोलवर दुचाकीस्वार धडकले आहेत. भविष्यात हे अपघात टाळण्यासाठी महावितरण विभागाने हे खांब रस्त्यालगत न उभारता गटार सोडून उभारावेत, अशी मागणी गवाणकर यांनी केली होती.
सध्या उभारण्यात आलेले हे खांब रस्ता साइडपट्टीवरच उभारलेले आहेत. त्या खांबांमुळे अपघात झाल्यास याची पूर्ण जबाबदारी महावितरण व बांधकाम विभागाची राहील. – अजित गवाणकर, माजी सभापती, शिवसेना उबाठा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 11-12-2024














