रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळाच्या वधू-वर मेळाव्याला मोठा प्रतिसाद

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली. वधू आणि वर यांनी एकमेकांची ओळख करून घेतली.

मेळाव्याची सुरवात मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सतिशराव साळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्राचीताई शिंदे, एमबीएफ रत्नागिरी चॅप्टर अध्यक्ष समीर इंदुलकर, आशाताई साळवी, प्रमोद निकम, संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष तावडे यांनी वधू-वर व पालकांना मार्गदर्शन केले. विवाह जमण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील अनुभव, अडचणींवर मात करून तडजोडीने विचार करून विवाह जमवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्याबाबत मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट वधू-वरांसाठी स्वतःचा उत्तम परिचय करन देणाऱ्या वधू-वरांना बक्षिस जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे वधू डॉ. सिद्धी चाळके व वर सौरभ माने यांची निवड करण्यात आली व त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकार डान्स अॅकॅडमीचे संचालक अमित कदम यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा वधू-वर मेळावा पार पडला. मराठा ज्ञाती बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षत्रिय मराठा मंडळाने आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 11-12-2024