संगमेश्वर : कुंभारखाणी बुद्रुक कडवई परिसरात कुठेही पट्टेरी वाघाचे अस्तित्व नाही

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक कडवईदरम्यान घोसाळकर कोंड येथील सार्वजनिक नळपाणी पुरवठा टाकीजवळ पट्टेरी वाघ असल्याची माहिती ग्रामस्थ संजय घोसाळकर यांनी देताच वन विभागाकडून तातडीने परिसराची पाहणी केली; मात्र त्या परिसरात कुठेही पट्टेरी वाघाचे अस्तित्व नाही. तो पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे वन विभागाकडून जाहीर करण्यात आले तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन देवरूख वनखात्याने केले आहे.

कुंभारखाणी बुद्रुक व कडवईदरम्यान खिंडीतून रस्ता आहे. हा रस्ता जंगलातून जातो. या जंगलात वाहनधारकांना रात्री अपरात्री बिबटे दृष्टीस पडतात. पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्लेही वाढलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी घोसाळकर कोंड येथील सार्वजनिक नळपाणी पुरवठा टाकीजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघ असल्याचे संजय घोसाळकर यांनी सांगितले. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे भीतीदायक झाले आहे. कुंभारखाणी बुद्रुक कोड हुंबरठ येथील छोटू सुर्वे यांचा बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्या बकरी बांधण्याच्या गोठ्यात बकऱ्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बिबट्या जवळपास आला होता; मात्र छोटू सुर्वे यांना वेळीच जाग आल्यामुळे त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याला पिटाळून लावले. या परिसरात सांयकाळ झाली की, लोकांना फिरणे धोकादायक झालेले आहे. याबाबत वनखात्याला कळवूनही संबंधिताकडून काही उपाययोजना केली जात नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून, जंगल नाहीसे होत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचे खाद्य नष्ट होत आहे. परिणामी, बिबट्यासारखे जंगली प्राणी भक्ष्य मिळवण्याच्या हेतूने आता मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. वनखात्याने जंगलतोडीला आळा घातला, तर हे सर्व बंद होईल, असे लोकांचे म्हणणे आहे.

पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती मिळताच कडवईत घटनास्थळाला भेट दिली. आपल्या भागात कुठेही पट्टेरी वाघाचे अस्तित्व नाही. घोसाळकर यांनी पाहिलेला तो वाघ नसून, पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे. लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. – तौकिक मुल्ला, वनपाल, संगमेश्वर

मी सांयकाळी सहाच्या सुमारास काजूच्या बागेत कामानिमित्त गेलो होतो. अचानक मला पाण्याच्या टाकीजवळ वन्यप्राणी असत्याचे दिसले, त्याच्या अंगावर पट्टे दिसल्यामुळे तो वाघ असावा, असे वाटले. मोबाईलचा कॅमेरा चांगला नव्हता. त्यामुळे छायाचित्र स्पष्ट काढता आले नाही. – संजय घोसाळकर, घोसाळकरकोंड कडवई

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 11/Dec/2024