पाटण : ११ डिसेंबर १९६७ साली कोयना येथे झालेल्या ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाला आज तब्बल ५७ वर्षे पूर्ण झाली. कोयनेची सार्वत्रिक दैना करणाऱ्या या भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. त्यानंतर कोयनेला गतवैभव प्राप्त करून देण्यात कोणालाही म्हणावेसे यश मिळाले नाही, हीच आजवरची शोकांतिका. त्यावेळी अनेक पिढ्यांनी फोडलेल्या किंकाळ्या व टाहो
आजही अनेक पिढ्यांच्या कानात घुमत आहे.
११ डिसेंबर १९६७ साली भूकंप झाला. त्यात शेकडोंचा जीव गेला, तर हजारो कायमचे जायबंदी झाल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. राजकारण्यांनी आजवर केवळ भूकंपग्रस्त दाखला देण्याच्या प्रक्रियेत तीन ते चार पिढ्या बरबाद केल्या असल्या, तरी अद्यापही किमान दाखलेही बहुतांश भूकंपग्रस्तांना मिळालेच नाहीत.
ज्यांना मिळाले त्यांना प्रशासकीय तांत्रिक अडचणींच्या कात्रीचा सामना करावा लागला.
कोयना धरण व भूकंपाचा भलेही नैसर्गिक व तांत्रिक कसलाही संबंध नसला तरी या विभागात सातत्याने होणाऱ्या भूकंपांने हा तालुका भूकंपग्रस्त म्हणून घोषीत केल्यामुळे येथे औद्योगिक विकासाला जागेवरच पायबंद बसले. ११ डिसेंबर १९६७ च्या विनाशकारी भूकंपा अगोदर देशातील नामवंत पर्यटन स्थळांमध्ये कोयनेचा समावेश होता. या भूकंपाने एका बाजूला कोयनेचे सार्वत्रिक वैभव हिरावून घेतले त्याचवेळी दुसरीकडे शेकडोंचा जीव घेत हजारोंना कायमचे जायबंदी करत त्याच पटीत संसारांची राखरांगोळी केली. आज ५७ वर्षांनंतरही या परिस्थितीत म्हणावेसे सकारात्मक बदल तर घडलेच नाहीत.
निदान येणाऱ्या काळात तरी याचा विचार होवून संबधितांचे पुनर्वसन, शासकीय नोकऱ्यांत समावेश, नागरी सुविधांचा प्रलंबित प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणे, पर्यटनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्यांना सार्वत्रिक न्याय द्यावा त्यांना जगण्याचे साधन देणे हीच त्या भूकंपात गाडले गेलेल्या भूमिपुत्रांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कोयना धरण परिसरात आजपर्यंत झाले १,६७२ भूकंप
१९६३ पासून कोयना धरणाने आजपर्यंत तब्बल १ लाख २१ हजार ७०१ भूकंपाचे धक्के पचवले. त्यात ३ रिश्टर स्केलपेक्षा कमी १ लाख १९ हजार ९२४, ३ते ४ रिश्टर स्केल १६७२, ४ ते ५ मधील ९६ व ५ रिश्टर स्केलच्यावर ९ भूकंपाची नोंद आहे. यात सर्वात मोठा म्हणजेच ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप ११ डिसेंबर १९६७ साली झाला होता. एकूण १,२१,७०१ भूकंपांची नोंद झाली त्यापैकी जाणवलेल्या भूकंपांची संख्या १६७२ इतकी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 11/Dec/2024














