रत्नागिरी : पाचवी,आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती दिली.

शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. शाळा नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, अद्याप काही शाळांकडून कार्यवाही प्रलंबित असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.

३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 11/Dec/2024