चिपळूण : शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात शास्त्रीय पद्धतीने शेवंतीची लागवड

सावर्डे : शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय, खरवते दहिवलीमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत शेवंती फुलांची लागवड करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीने ही फुलशेती करण्यात येत आहे.

कोकणामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून फुलशेती करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, कोकणातील वातावरण हे फुलशेतीस अगदी पोषक आहे. स्थानिक शेतक-यांमध्ये फुलशेतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांकडून हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी शेवंतीच्या श्वेता व्हाईट व समृद्धी व्हाईट या जातींची निवड करण्यात आली आहे. ही संपूर्ण फुलशेती मल्चिंगच्या गादी वाफ्यांवर साकारण्यात आली आहे. ४५ बाय ४५ से.मी अंतरावर सुमारे बाराशे रोपांची लागवड विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकही मेहनत घेत आहेत.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या संशोधनात्मक प्रकल्पाबाबत गौरवोद्‌गार काढले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. स्मिता जाधव व डॉ. ओंकार निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कॅडॉक्स हडसन इफेक्टचा वापर
महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विशेष बाब म्हणजे या संशोधनात्मक प्रकल्पासाठी कॅडॉक्स हडसन इफेक्ट ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सुमारे ४६ एलईडी बल्बचा बापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे फुलांची संख्या, आकार, वजन व आयुष्यमान वाढीस मदत होते. तसेच रोपांमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया उत्तमरीत्या चालू राहते. विद्यार्थ्यांकडून या सर्व रोपांना सुमारे सात ते आठ तास कृत्रिम प्रकाशाचा पुरवठा केला जातो, जेणेकरून फुलांच्या उत्पत्रामध्ये वाढ होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 11/Dec/2024