चिपळूण : जंगलतोडीमुळे प्रजाती अस्तित्त्वाच्या भवितव्यासाठी धडपडणाऱ्या हॉर्नबिल अर्थात धनेश पक्ष्याला वाचविण्यासाठी आता निसर्गप्रेमी पुढे आले आहेत. जिल्हाभरात चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने धनेशची घरटी असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा करण्यासाठी गावोगाव सरपंचांसह निसर्गप्रेमींना आवाहन करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तसेच चिपळूण शहर परिसरात ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
त्या संदर्भात नुकतीच पर्यावरण व पक्षी निरीक्षक अभ्यासकांची बैठक झाली. देवरूख येथील नर्सरीच्या धर्तीवर चिपळूण अर्थात उत्तर रत्नागिरी विभागासाठी उपयुक्त ठरेल, अशी नर्सरी उभारण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत हॉर्नबिल अर्थात धनेश या पक्ष्याच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी त्याचबरोबर अन्य दुर्मीळ होत असलेल्या पक्ष्यांबाबत अभ्यास करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

धनेश पक्ष्याची प्रजाती पर्यावरण व निसर्ग संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या प्रजातीमध्ये भविष्यात वाढ होण्याकरिता आता पक्षी अभ्यासक पर्यावरण व निसर्गप्रेमींनी चळवळ उभी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या करिता जिल्हाभरातील गावागावातून निसर्गप्रेमींसह गावातील प्रमुख गावकर, सरपंच यांच्या माध्यमातून धनेशची घरटी असलेल्या झाडांची व ठिकाणांची माहिती गोळा करण्याकरिता नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार लवकरच संबंधित व्यक्तिंना संपर्क करून अशी माहिती निसर्गप्रेमींकडे कशाप्रकारे पाठवावी, याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.
पक्षी हा घटक समृद्ध निसर्गसंपदेचे प्रतीक मानले जाते. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्गसंपत्तीचे अस्तित्व आहे अशा ठिकाणी विविध वर्गातील पक्ष्यांचे अस्तित्व जाणवते. वृक्षसंपदेमुळे पर्यावरण व निसर्ग समृद्ध होऊन पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. त्यामुळे स्थानिक प्रजातीमधील पक्ष्यांसह मायग्रेटेड अर्थात विविध हंगामात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात थवे निसर्गसंपन्न असलेल्या प्रदेशात येतात. सध्या पर्यावरण व निसर्गप्रेमी यांच्यासह पक्षी अभ्यासक-निरीक्षकांकडून धनेश पक्ष्याच्या अस्तित्त्वाविषयी अभ्यास करताना त्यांची पिढी येत्या काही वर्षांत नष्ट होऊन दर्मीळ होण्याची चिंता व्यक्त होत आहे. या पक्ष्यांना आवश्यक असणारी वृक्षसंपदा काळाच्या ओघात नष्ट होत असल्याने त्यांचे खाद्यान्न आणि वास्तव्याची ठिकाणे संपत चालली आहेत.
निसर्गातील प्रमुख घटक असलेल्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्थलांतरित पक्ष्यांची संख्यादेखील घटत आहे. विविध हंगामात व तीन ऋतुंमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या थव्यांचे अस्तित्त्व जाणवते. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांचा आढावा व पक्षी निरीक्षकांचा अभ्यास लक्षात घेता काही स्थलांतरित पक्ष्यांचे विविध हंगामातील ऋतुंमध्ये आगमन होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कोकणात रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यात गिधाड या प्रजातीची काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात अस्तित्त्व होते. खाद्यान्नातून गिधाडांच्या शरीरावर होणारे अंतर्गत आघात त्यामुळे गिधाडांची पिढी हळूहळू दुर्मीळ व शारीरिकदृष्ट्या अपंग होत असल्याचे धक्कादायक निरीक्षण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. हॉर्नबिल पक्ष्याला वाचविण्याकरिता आवश्यक असणारी वृक्षराजी नैसर्गिकरित्या तयार करण्याकरिता नर्सरीसारखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा पहिला यशस्वी प्रयोग देवरूखमधील मोरे यांनी केला. आता त्याच धर्तीवर पक्षी निरीक्षकांची टीम चिपळूण येथेही हा उपक्रम हाती घेणार आहे. चिपळुणातील बैठकीला पक्षी अभ्यासक प्रतीक मोरे, नयनीश गुढेकर, नितीन नार्वेकर, शाहनवाज शाह, समीर कोवळे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 12/Dec/2024














