दापोली : दापोलीचे पर्यटनक्षेत्र झपाट्याने वाढत असताना त्याच पटीने ते विकले देखील जात आहे. याच पर्यटन क्षेत्रात राज्यातील आजी- माजी मंत्र्यांच्या शेकडो एकर जागा नातेवाईक, मित्र यांचे नावे खरेदी करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. काही ठिकाणी तर मोठमोठे प्रकल्प उभे राहताना दिसत असून स्थानिक आणि विकासक यांच्या वादातून या बाबी पुढे येत आहेत. या जागा खरेदी व्यवहारात, वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी, आमदार, खासदारदेखील मागे दिसत नसून मध्यंतरीच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील मंत्र्यांची, आमदारांची बेनामी मालमत्तेविरोधात आवाज उठविल्याने दापोलीत जागा खरेदीचे व्यवहार हळूहळू समोर येऊ लागले आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी मोठमोठे डोंगर खरेदी करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी आता हळूहळू विकासकामे होत असल्याने तालुका किती शिल्लक राहिला आहे, हे त्यानंतर दिसू लागले आहे. तालुक्यातील शेकडो एकर जागा विकल्या गेल्याने, पारंपरिक वाटा, रस्ते, सार्वजनिक सुविधा या नामशेष होत आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आता जमीन खरेदीकर्ते आणि शेतकरी अशी वादविवादाची सुरुवात झाली आहे.
मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात दिसणारे गृह प्रकल्प आता दापोलीत उभारी घेताना दिसत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाणी, सुविधा, वीज आणि अन्य सुविधा अशा प्रकल्पांना तत्काळ मिळत आहेत. या पाच वर्षात जवळपास दापोली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला असून ही आमची १०० एकर जागा असे सांगण्यास स्थानिक शेतकऱ्यांकडे तेवढी जमिनच शिल्लक राहिलेली नाही.
मागील दहा वर्षापूर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी सात हजार ते दहा हजार इतक्या दराने एकरी जागा विकल्या गेल्या आहेत. त्या नंतर आता तीन ते चार लाख एकरी दर असे व्यवहार होताना दिसत आहेत. काहींनी इन्व्हेस्टमेंट म्हणून दापोली पर्यटन क्षेत्रात खरेदी केलेली जागा आता कोट्यवधींना विकली जातानाचे व्यवहार दिसत आहेत. या खरेदी विक्री व्यवहारामुळे दापोलीत जागांचे दर चांगलेच वधारले असून आता मुंबईत घर घेणे सोप झाले आहे पण दापोलीत जागा घेणे कठीण झाले आहे, असे म्हणण्याची वेळ आता स्थानिकांवर आली आहे.
जागा विकून त्याचे पैसे घेण्यापेक्षा त्यात आंबा, काजू, लागवड केल्यास तीन वर्षान पीक येण्यास सुरुवात होते. योग्य निगा राखल्यास वर्षभर पुरतील एवढे पैसेही मिळतात. त्यामुळे आता आहेत त्या जागा तरी विकू नका, नाहीतर आयुष्यभर स्वतःला आणि पुढच्या पिढ्यांना दुसऱ्याकडे मजूर म्हणून राबावे लागेल. – अरविंद अनंत मांडवकर, काजू उत्पादक शेतकरी, रुखी दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 12/Dec/2024














