रत्नागिरी : दुग्ध व्यवसायाची कास आता जिल्हा परिषदेच्या हाती

रत्नागिरी : शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाचे बळकटी करण्यासाठी दुग्ध विकास विभाग, राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे विलिनीकरण केले जाणार आहे. हा विभाग आता जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली आणला जात आहे. यामुळे आता दुग्ध व्यवसायाची कास जिल्हा परिषदेच्या हातात असणार आहे.

यामध्ये जिल्हा विकास डेअरी अधिकारी आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी ही दोन्हे पदे संपुष्टात आणून त्याऐवजी पशुसंवर्धन उपायुक्त हे या विभागाचे प्रमुख असणार आहेत लवकरच हा विभाग कार्यान्वित होणार असून, तशा प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे येणाऱ्या काळात पशुसंवर्धनसोबतच दूध संस्था दूध संकलन, दूध प्लॅन्टच्या दोन्हीही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या हातात येणार आहेत.

शेतकरी, पशुपालक व दुग्ध व्यावसायिक यांच्यासमोरील आव्हाने पाहता पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उद्योजकतेच्या दिशेने व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पशुपालनामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा सरकारचा मानस आहे.

पशुसंवर्धन विभाग (राज्य), पशुसंवर्धन विभाग (जिल्हा परिषद) आणि दुग्ध विकास विभाग (डेअरी) असे तीन विभाग स्वतंत्र कार्यरत होते. मात्र तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी हे तीनही विभाग एकाच छताखाली घेण्याचा शासन निर्णय काढला होता.

आता या आदेशाच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या सात पशुवैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था आहेत. या ठिकाणी पशुसेवा दिल्या जात आहे.

जिल्हा परिषदेचे नियंत्रण
पूर्वी राज्याचा पशुवैद्यकीय विभाग हा जिल्हाधिकारी यांच्याशी थेट कनेक्ट होता. तर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभाग सीईओंकडे होता. दुग्ध व्यवसाय विकास विभागाचेही स्वतंत्र अस्तित्व होते. मात्र, या तीनही विभागांचे विलिनीकरण होणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग असे नावे असेल. त्याचे जिल्हास्तरावर नियंत्रण जिल्हा परिषद सीईओंकडे राहील. साहजिकच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचेही या विभागावर विशेष लक्ष असणार आहे.

तालुका पातळीवरही नवी रचना
तालुक्याच्या ठिकाणी यापूर्वी पंचायत समिती विस्तार कक्षात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद अस्तित्वात होते. मात्र, आता तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सहायक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय गट यांच्या नेमणुका असतील. तसेच तालुका चिकित्सालय सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ९ तालुक्यांत पशुचिकित्सालय ती त्या ठिकाणी सहायक आयुक्तांची नेमणूक केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 12/Dec/2024