रत्नागिरी : राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघ डोंगराळ भागाचा आहे. तेथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासूनचा मोठा बॅकलॉक आहे म्हणून आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याकडे माझा कल आहे. ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी समस्या आहे म्हणून रस्त्यांच्या विकासासाठी वेगळे पॅकेज मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी दिली.
रत्नागिरीत बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आयोजित मोर्चाला उपस्थित राहिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, राजापूरच्या स्ट्रीटलाईटचे १३ लाखांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे येथील वीजपुरवठा महावितरणने बंद केला होता. याबाबत महावितरणशी चर्चा करून टप्प्यात बिल भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील जनतेची आरोग्याची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी आरोग्य सुविधेला प्राधान्य देणार आहे. ग्रामीण भागांतील शिक्षणाकडे आपले विशेष लक्ष असणार आहे. अनेक वाड्यावस्त्यांवर रस्तेही पोहोचलेले नाहीत.
ग्रामीण विभागातील जनतेशी संवाद वाढवत त्यांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहणार आहे. राजापूरच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा मोठा बॅकलॉक आहे. तो भरून काढण्यासाठी शासनाकडून वेगळे पॅकेज आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
शिवसेना चारपटीने वाढवू
किरण सामंत आमदार नव्हते तेव्हा आमदारांपेक्षा चारपटीने जास्त विकासकामे करत होते. तेव्हा त्यांनी आरोग्य, पाणी योजना आदी कामे केली. आता तर ते आमदार झाले आहेत म्हणजे बुलेट ट्रेनच्या वेगाने ते राजापूर मतदारसंघाचा विकास करतील. आम्ही दोन्ही बंधू अशी कामे करू की, शिवसेना पक्ष आणखी चारपटीने वाढेल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 12/Dec/2024














