संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर पाटण घाटमार्ग सर्वेक्षण कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश अंतिम टप्यात आला आहे. संगमेश्वर ते पाटण या ४६ किमीमधील लांबीच्या सर्वेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेअर्स अॅण्ड इंजिनिअरिंग कन्सल्टेंट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरी कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या उपस्थितीत मोनार्च कंपनीच्या तांत्रिक टीमची बैठक १६ डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत सर्वेक्षण कामाचे नियोजन ठरणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिका-यांनी दिली, जानेवारी २०२५ मध्ये येथील सर्वेक्षणाला सुरुवात होऊन सर्वेक्षण अहवालातून तयार झालेला डीपीआर शासनाला सादर होणार आहे. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामासाठी समन्वय संतोष येडगे यांचा पाठपुरावा सुरू असून, त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे.
संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० किमीचा रस्ता आहे. यापैकी २६.६०० किमी एकेरो रस्ता तयार असून, फक्त २० किमी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० किमी तर, सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० किमी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक येहगे यांनी सांगितले. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग डीपीआरसाठी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआरसाठी तरतूद केलेल्या निधीसाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
सह्याद्रीतील गावांना फायदा
संगमेश्वरपासून सुरू होणाऱ्या या घाटमार्गाचा कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी, तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेववणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्वे, नांदगाव, येगांव, कुटूरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी आणि खाडीपट्टयातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.
१९९९ मध्ये युती सरकारकडून भूमिपूजन
संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या महायुती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्हांतील ४ लाखापेक्षा अधिक जनता आग्रही आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 12/Dec/2024














