राजापूर आगारासमोर ‘फ्लायओव्हर’ बांधण्याची मागणी

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाचे एसटी डेपोसमोरील कामे रखडली आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करताना वाहनचालकांसह पादचारी, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. याकडे भाजपचे तालुका सरचिटणीस मोहन घुमे यांनी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन विभाग महसूल आणि नगरपालिकेचे लक्ष वेधले आहे. एसटी डेपोसमोरील भागामध्ये सुरक्षितता आणि सुखरूप प्रवासाच्यादृ‌ष्टीने या ठिकाणी अंडरपास किंवा फ्लायओव्हर ब्रीजची उभारणी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून, शहरातील एसटी डेपोसमोरही चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे; मात्र डेपोसमोरील चौपदरीकरणाचे काम अर्थवट आहे. या ठिकाणी सर्व बाजूंनी लोकवस्ती असून, छोटेशी बाजारपेठही वसलेली असून तिचा विस्तारही होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी मुलांची नेहमीच रस्त्यावरून वर्दळ असते. या परिसरातील मध्यवर्ती भाग असलेल्या या ठिकाणी चारही बाजूंनी रस्त्यावरून वर्दळ असली, तरी प्रवाशांसाह वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्यादृ‌र्शने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यातून नाहक अपघाताला आमंत्रण मिळालेले असून, अपघाताची मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस घुमे यांनी निवेदनाद्वारे या रखडलेल्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 12/Dec/2024