बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राजापूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन

राजापूर (वार्ताहर): बांग्लादेशात सुरू असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन व अन्य जनजातीवरील अमानुष अत्याचार आणि हत्याकांडाच्या निषेधार्त गुरूवारी राजापूर तहसिलदार कार्यालयासमोर विश्वहिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक निषेध आंदोलन करण्यात आले.

तर यावेळी बांग्लादेशात सुरू असलेले हिंदू व अन्य जातीवरिल अनैतिक अत्याचार व हत्याकांड ताबडतोब थांबविण्यात यावे आणि इस्कॉनच्या सांधूची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार सौ. दीपाली पंडीत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या निवेदनात बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पध्दतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी. तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौध्द इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करुन टाकले आहे. बांगलादेशचे सरकार देखील हिंदूसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मुकसंमतीच देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो. या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोहासारखी कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती ती घटून आज केवळ आठ टक्केच राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील ८% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता वादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारतीय शासनास आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदुच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरीत मुक्तता करावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे असे नमुद करण्यात आले आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद राजपूर प्रखंड अध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेद्र कुशे, सनातन संस्थेचे विनोद गादीकर, भास्कर खडपे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, विश्व हिंदू परिषदेच् संदेश टिळेकर, प्रतिभा मराठे, माधवी हर्डीकर, शितल रहाटे, शितल पटेल, संदेश आंबेकर, सुभाष पवार, रविंद्र बावधनकर, मोहन पाडावे, दिलीप गोखले, संतोष तांबे आदींसह हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 12-12-2024