नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे आज घडत असलेल्या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवणारे अजित पवार हे स्वत: आज सकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवस निमित्त आपण भेट घेतल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यांनतर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीदेखील भेट घेतली होती. यानंतर अनोखी भेट घडून आली आहे. अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे अमित शाह शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते तेच शाह शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या भेटीमागे वेगळं काही राजकारण आहे का? अशी चर्चा सुरु आहे. या भेटीमागे एक देश, एक निवडणूक हे विधेयक देखील असू शकतं. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यानंतर याबाबतचं विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत सादर केलं जाईल. तिथे बहुमताने ते मंजूर केलं जाईल. त्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल. त्यामुळे अमित शाह या भेटीत शरद पवार यांना एक देश, एक निवडणूक या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विनंती करु शकतात. दरम्यान, अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
“आम्ही गेली वर्षोनुवर्षे शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आलो आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं आणि त्यांचं दर्शन घेणं हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असतील तर हे राजकीय संस्कृतीचं चांगलं दर्शन आहे. अमित शाह यांनी शरद पवार यांच्याबाबत चांगल्या पद्धतीच्या सद्भावना दाखवल्या आहेत. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देखील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आलेले बघायला मिळाले होते. ही आपली एक राजकीय संस्कृती आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“मी कृपा करुन आपल्या सर्वांना विनंती करतो, आम्ही आज शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटलेलो आहोत. त्याला राजकीय वळण लावणं हे आजच्या सदिच्छा भेटीला छेद देणारं ठरेल. या भेटीतून कोणताही राजकीय अन्वार्य काढू नये, अशी आमची नम्रतेची विनंती आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 12-12-2024













