Ratnagiri : नोव्हेंबर महिन्यात एसटीतून ६० लाख प्रवाशांचा प्रवास; एसटीला ११ कोटी २६ लाखांचे उत्पन्न

रत्नागिरी : एसटी महामंडळाची लालापरी सुस्साट आहे. दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी, विधानसभी निवडणुका, शालेय सहली, प्रासंगिक करारांमुळे रत्नागिरी एसटी विभाग फायद्यात आली आहे. प्रवाशांची मागणी, योग्य नियोजन यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने नोव्हेंबरमध्ये एकूण ६३ लाख ४० हजार किमीचा प्रवास करत ६० लाख प्रवाशांची वाहतूक केली. या एका महिन्यात एसटीने ११ कोटी २६ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी अद्ययावत बसेसची उपलब्धता केली. वेगवेगळ्या योजनांमधून प्रवाशांसाठी सवलती देण्यात आल्या. महिलांना व ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकीटदरात प्रवास, ७५ वर्षांपुढील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना राबविण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली. हाफ तिकिटामुळे नोकरदार महिला कर्मचारीही एसटीतून प्रवास करू लागल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या भारमानात वाढ झाली आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

चिपळूणला सर्वाधिक उत्पन्न
उत्पन्नात रत्नागिरी विभागामध्ये चिपळूण आगार प्रथम क्रमांकावर आहे. तीन कोटी ७७ लाख ४६ हजार रुपये उत्पन्न महिन्‍याभरात मिळविले आहे. रत्नागिरी आगार द्वितीय क्रमांकावर असून, तीन कोटी ४९ लाख ६ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शेवटच्या क्रमांकावर मंडणगड आगार असून एक कोटी ७ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 12-12-2024