गुहागर : ‘विहिंप’च्या कार्यकर्त्यांनी रोखली गो तस्करी; पाच जणांवर कारवाई

गुहागर : बुधवारी रात्री पोमेंडी परिसरातून गो वंशीय जनावरांची वाहतूक करणारे चारचाकी वाहन विहीपच्या कार्यकत्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना पकडल्यावर वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला. ते वाहन चिपळूण पोलिसांनी पकडून गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कालावधीत पोमेंडीत विहींपच्या कार्यकर्त्यांची नजर चुकवून एकजण पळत होता. त्याला रात्रीची गस्त घालणाऱ्या गुहागर पोलिसांनी जेरबंद केले.

गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून एक वाहन (एमएच०६, बीडब्ल्यू ९६४४) बुधवारी रात्री १च्या सुमारास वेळंबच्या दिशेने चालले होते. पोमेंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्रीराम विचारे यांना याची माहिती मिळाली. त्यामुळे पोमेंडी, पालशेत, वेळंब परिसरातील विहींपचे कार्यकर्ते पाळत ठेवून होते. पोमेंडीत आलेल्या वाहनाचा संशय आल्याने श्रीराम विचारे यांनी हे वाहन थांबवले. यावेळी पोमेंडीचे पोलीस पाटील सुरेश विचारे त्यांच्यासोबत होते. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे दिसून आली. तातडीने विचारे यांनी पालशेतमधून विजय नागवेकर यांना बोलावून घेतले तर पोलीस पाटील सुरेश विचारे यांनी गुहागर पोलिसांना खबर केली.

वाहनातून दोनजण उतरले व त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. मात्र विचारे आणि मंडळी या गोष्टी मान्य करण्यास तयार नव्हते. जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का, असे विचारत विचारे आणि त्यांच्या साथीदारांनी त्या दोघांना अडवले. हा प्रकार पाहून वाहनचालकाने तेथून वाहनासह पोबारा केला. हे लक्षात येताच विहीपच्या कार्यकर्त्यांनी कोकण प्रांत सहमंत्री अनिऋद्ध भावे यांना याची माहिती दिली. भावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांना दूरध्वनीवरुन गो तस्करी करणारे वाहन घेऊन चालक फरार झाल्याचे सांगितले. राजमाने यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. चिपळूण बायपास येथे हे वाहन चिपळूण पोलिसांनी पकडले.

पोमेंडीतून वाहनासह चालक पळल्याने उडालेल्या गोंधळात विचारे आणि सहकाऱ्यांनी पकडलेल्या दोघांपैकी एकाने तेथून पलायन केले.

परंतु पोमेंडीत गायी असलेली गाडी अडकविल्याचे समजल्यानंतर गस्त घालणारे पोलीस वेळंबवरुन पोमेंडीच्या दिशेने येत होते. त्यांनी पळणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. अशा तन्हेने रात्री १ वाजता सुरु झालेले थरारनाट्ध ३.३० च्या सुमारास संपले. विहीपचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी दोन आरोपींना घेऊन गुहागर पोलीस ठाणे गाठले. ५ च्या सुमारास चिपळूणकडे पलायन करुन गेलेले वाहन गायींसह गुहागर पोलीस ठाण्यात आले. या प्रकरणात गुहागर पोलिसांनी हिदायत जनिरुद्दीन उलदे (चालक), जावेद हुसेन दाऊद वाळवटकर, आनस अब्दुल रशीद खतीब (सर्वजण रा. मुरुड रायगड), संदीप पालशेतकर (मार्गाताम्हाणे) आणि निलेश काताळकर (पोमेंडी) यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 13/Dec/2024