लांजा : परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून जिल्ह्यातील लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीणच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. लांजा तहसीलदार यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीणच्या वतीने गुरुवारी लांजा तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निषेध व कडक कारवाईचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन लांजा नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांनी स्वीकारले.
लांजा तालुका बौद्धजन मंडळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे घडलेल्या घटनेमुळे समाजात अशांतता पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी ज्या संविधानाने देशाची एकता अखंडता बांधून ठेवले आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविकेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला राजद्रोहाची अथवा फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून देशामध्ये असे वाईट कृत्य कोणी करण्याचे धाडस करणार नाही. असा निर्णय ताबडतोब घेऊन आमच्या भावनांचा विचार करावा अन्यथा समाजामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लांजा तालुका बौद्धजन मंडळच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. राज्याची सुव्यवस्था बिघडू पाहणाऱ्या समाजकंटकाला कडक शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लांजा तहसीलदार यांना निवेदन देताना लांजा बौद्धजन मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सचिन जाधव, कार्याध्यक्ष लहू कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सल्लागार प्रभाकर कांबळे, दीपक जाधव, अखिल नाईक आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 13/Dec/2024














