रत्नागिरी : येथील जनतेने आमचे खासदार आणि आमदार निवडून दिले असून, आता रोजगारासाठी कोकणातून स्थलांतर थांबवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात 16 डिसेंबरनंतर दीड ते दोन लाख रोजगार मिळावेत, असा रिफायनरी प्रकल्प राजापुरातच आणावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. यासाठी दहा हजार एकर जागा देण्यास तयार असलेल्या शेतकर्यांना सोबत घेऊन जाणार असल्याची माहिती माजी आमदार आणि लोकसभा क्षेत्राचे भाजपचे प्रभारी प्रमोद जठार यांनी दिली.
रिफायनरी प्रकल्प समर्थक आणि जागा मालक यांची बैठक भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत घेतली. यावेळी विल्ये येथील जागा मालक प्रल्हाद तावडे, साखर गोठीवरे येथील सदाशिव तांबडे, विल्ये येथील फारुख साखरकर, बारसू येथील विनायक कदम हे जागा मालक, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, नंदू चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जठार म्हणाले की, सन 2017 पासून रिफायनरी प्रकल्प रखडला आहे. कोकणात रोजगारासाठी हा प्रकल्प होणे काळाजी गरज आहे. खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री उदय सामंत यांच्या या माध्यमातून आपण हा प्रकल्प व्हावा यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहोत. रिफायनरी प्रकल्पासाठी 10 हजार एकर जागा देण्यास जे शेतकरी तयार आहेत, त्यांना घेऊन आपण नागपूर येथे जाणार असून, मुख्यमंत्र्यांकडे हा प्रकल्प राजापुरातच आणावा यासाठी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा वेग वाढवणार असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे रिफायनरी आल्यास कोकणच्या विकासाचा वेग वाढेल, असेही त्यांनी सांगितले रिफायनरीमुळे बंदरे विकासालाही चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यावर ते सुरु होईपर्यंत सात ते आठ वर्ष लागतील तोपर्यंत स्थानिकांना आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणीही उपस्थित स्थानिक जागा मालकांनी पत्रकार परिषदेत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 13-12-2024














