मंडणगड : मंडणगडमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, मायनिंग वाहतूक आणि अन्य विविध प्रश्नांसंदर्भात मंडणगड तालुका संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलन करू, असा इशारा मंडणगड संघर्ष समितीने दिला आहे.
तहसीलदार अक्षय ढाकणे यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे १५ ऑगस्टला तहारील कार्यालयासमीर मंडणगड तालुका संघर्ष समितीने आमरण उपोषण केले होते. या वेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. खड्डे भरून केवळ मलमपट्टी करण्यात आलेली आहे. म्हाळ ते आंबडवे या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही निदर्शनास येत आहे. उपोषणानंतर तीन महिने होऊनही रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. तुळशी घाटात दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे.
तेथील रस्ता सुस्थितीत नाही तसेच महामार्गावरून मायनिंगच्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी चालू झाली आहे.
मायनिंगच्या एकाचवेळी धावणाऱ्या वाहनांमुळे बाजारपेठेतील खाद्यवस्तूंवर धूळ पसरत असून त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचबरोबर मोठ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता आहे. वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वजन भरलेले असल्यामुळे रस्ते खचण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या विषयासंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास २५ डिसेंबरला मंडणगड तालुका संघर्ष समितीकडून जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलगे, सचिव रोशन राजविलकर, समन्वयक धीरज कदम, सचिन जाधव, विधान पवार, प्रसाद जाधव, प्रेम साळवी, आकाश पवार यांच्या सह्या आहेत.
शौचालय पूर्णपणे नादुरुस्त
तहसील कार्यालयाजवळील शौचालय व्यवस्था पूर्णपणे नादुरुस्त आहे. तेथील दुर्गंधीचे प्रमाण कार्यालय परिसरात वाढलेले आहे. त्यावर ही योग्य उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 13/Dec/2024














