विकासकामे 31 मार्चपूर्वी मार्गी लावा; लांजा येथील पाणी टंचाईकृती आराखडा बैठकीत आ. किरण सामंत यांच्या अधिकार्‍यांना सूचना

लांजा : तालुक्यातील पाणी प्रश्न आणि त्याबाबत सुरू असलेली कामे पाहता 58 कामे पूर्णत्वाला गेली असून 62 कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, ही सर्व कामे कोणतेही सबब न देता 31 मार्चच्या पूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. लांजा तालुक्यातील पाणी प्रश्नांबरोबरच सर्व विकास कामे मार्गी लावण्याच्या सक्त सूचना लांजा-राजापूर-साखरपाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी सर्व ठेकेदार व अधिकार्‍यांना दिल्या. लांजातील पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते.

नागरिकांचा पाणी प्रश्न तत्काळ मार्गी लावा. हरकती, निधीची उपलब्धता, जागेची कमतरता किंवा अन्य वेठीस धरणार्‍या शुल्लक कारणांमुळे कामे थांबू नका. कामे मंजूर करण्याचे काम माझे कामे पुर्णत्वाला नेण्याचे काम तुमचे आहे, असेही खडे बोल सामंत यांनी सुनावले.

लांजा पंचायत समिती पाणी टंचाई कृती आराखडा बैठक गुरुवारी लांजा शहरातील संकल्पसिद्धी हॉल येथे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामपंचायत पाणी पुरवठा उपअभियंता एल. एस. करंडे, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजन देसाई, एस. एन. कांबळे, महेश खामकर, संजय नवाथे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. सामंत म्हणाले की, जी कामे प्रस्तावित आहेत, ज्यांना मंजुरी मिळली नाही, त्या कामाना लवकरच मंजुरी देण्यात येईल; मात्र अर्धवट सुरू असलेली कामे गतीने सुरू करा. ग्रामसेवक, तलाठी, उपअभियंता यांचे मार्गदर्शन घ्या. स्थानिक जनतेला वेठीस धरू नका. दुर्गम भागातील गाव आणि तेथील वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. टंचाईग्रस्त 7 गावे आणि 11 वाड्या आहेत, त्या ठिकाणी जलस्त्रोताचे प्रमाण कमी असल्याने त्या ठिकाणी उपाय योजनेेच्या दृष्टीने प्रयत्न असणार आहे. यावेळी महावितरण, बांधकाम, महसूल, ग्रामसेवक, पाणी पुरवठा, तलाठी कार्यालयांचे अधिकारी, सरपंच, नागरिक उपस्थित होते.

तालुक्यात पाणी टंचाईचे प्रमाण कमी
लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी तालुक्यातील नळपाणी योजना, विंधन विहिरी, गाळ उपसा कामे काही ठिकाणी झाली असून, काही ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र मागील काही वर्षाच्या तुलनेत लांजा तालुक्यात पाणी टंचाईचे प्रमाण कमी झाले असून, लांजा पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात दोनशेहून जास्त बंधारे बांधण्यात आल्याचे संगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 13-12-2024