रत्नागिरी : कर्ला येथील घरफोडीप्रकरणी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील कर्ला येथील घरातून भरदिवसा घरात घुसून तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवणार्‍या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रविवार, 8 डिसेंबर रोजी आवळल्या. त्याच्याकडून 2 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अलमुईब अजगर सोलकर (वय 29, रा. आयशा अपार्टमेंट कर्ला उर्दू शाळेच्या पाठीमागे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

चोरीची ही घटना बुधवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 वा. कालावधीत घडली होती.अलमुईब अजगर सोलकर विरोधात फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदाराच्या आधारे तपास करत असताना सोलकरला अटक केली.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार विलास जाधव, अरुण चाळके, अमोल भोसले, राहुल जाधव, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलिस नाईक भालचंद्र मयेकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, कौस्तुभ जाधव यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 13-12-2024