रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीत गॅस गळती होऊन ५३ विद्यार्थी बाधित झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या घटनेतील बाधित विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
तालुक्यातील जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिर जयगड, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयानजीक एलपीजी गॅसची गळती होऊन ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थ्यांना गॅसमुळे त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जेएसडब्ल्यू कंपनी एलपीजी गॅस टँकरमध्ये भरला जातो त्याठिकाणी देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. याच दरम्यान अचानक गॅस गळती झाली आणि नजिकच्या परिसरात हा गॅस पसरला. नजीक असणाऱ्या शाळेत दुपारी सर्व विद्यार्थी बसले होते आणि अचानक वायूचे लोट शाळेपर्यंत आले. त्यातच शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना वायूचा त्रास होऊ लागला. जो तो सैरावैरा पळू लागला. नेमकं काय घडलं? ते कोणालाच कळत नव्हतं. अचानक शाळेपर्यंत वायू गळतीचे लोण पोहचल्यानंतर काही विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.
गॅस गळतीमुळे विद्यार्थ्यांना त्रास माहिती जयगड पंचक्रोशीत पसरली आणि बघता बघता सारे पालक शाळेच्या दिशेने धावले. ही घटना घडल्यानंतर पालकांनी शाळेकडे धाव घेतली होती. अशावेळी पालकांनी रस्त्यावर मिळेल ती गाडी थांंबविली आणि नजीकचे रुग्णालय गाठले. खाजगी वाहनचालकांनी माणुसकी दाखवत शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांना हलविण्यासाठी वाहनांच्या रांगा लावल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे सुमारे ५३ विद्यार्थ्यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला. या सर्व विद्यार्थ्यांना विविध वाहनांमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या दुर्घटनेत एकूण ५३ विद्यार्थ्यांना गॅस गळतीची बाधा झाली आहे. त्यामध्ये दोन विद्यार्थीनी गंभीर असून दोघींना अतिदक्षता विभागात अधिक उपचाराकरीता दाखल केले आहे तर यातील काही बाधित विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात देखील उपचारासाठी दाखल केले आहे.
जिल्हा अधिकारी, पोलिस अधिक्षक घटनास्थळी गेल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक शंकर बर्गे, प्रांत अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची विचारपूस करीत डॉक्टरांना उपचाराबाबत त्यांनी सूचना केल्या.
बाधित विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
आर्या केतन पोवार रा.पेठवाडी जयगड, पूर्वी सुहास सावंत रा.जयगड बौद्धवाडी, राहियान रुकुद्दीन टेमकर रा. अकबर मोहल्ला जयगड, पेक्षा गुरुनाथ आढाव रा. संदखोल जयगड, तन्वी रविंद्र भवर, सहारा शेखर जाधव, अरोही ऊमेश सावंत, रिशा संजय परकल, मुर्बा मुबी राजवडकर, आरोशी विशान खोड, स्वरा. संदेश जाधव, भूमी श्रीधनकर, सामर्थी संदिप मोहीते, दुर्वा. श्रीधनकर, आरुशी विशाल खाडे, मुबाऊद्दीन राजवाडकर, साक्षी महेंद्र. गोताड, मुश्रीदा जावेद टेमकर, अर्या कैलास सुर्वे, जुबीया तय्यब बंगाली, रीझा रियान वाडकर, नजीफा मोहसीन नरवणकर, रिया राजेद्र चोरगे, सायली दिपक भुवड, तन्वी. प्रताप सुर्वे, सुरक्षा पांडुरंग बेनेरे, रुशा संजय परकर, मुस्कान मोहसीन गुहाघरकर, माझीया बावटे, श्रावणी भोळ, श्रुती चिचकर, ग्रंथा राकेश पवार, साबीरा घोडेकर, अस्मिता भार्गव पाष्टे, अंकीता गणेश मयेकर, सैनिन जुबेर सांगरे, स्वरा महेंद्र गोताड, कृपा श्रीपाद परकर, मुबसिरा चौघुले, श्रावणी गुरव, रुमाना पीराजधी, सुरभी सुभाष कावळे, दिया घवाळी आदींना रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना उपचार करुन घरी सोडण्यात आले.
दाखल विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर, सर्वांवर उपचार सुरू: डॉ. जयप्रकाश रामानंद
जिल्हा रुग्णालयात जयगड येथील शाळेतील विद्यार्थी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत, हे कशामुळे झाले याबत आम्हाला माहिती नाही परंतु वायू गळतीमुळे त्रास होऊ शकतो. दाखल सर्व विद्यार्थी तज्ञ वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देणार असल्याची माहिती डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 13-12-2024














