तुळसणी आग्रेवाडीत महिला बचतगटांनी केली हळदीच्या रोपांची लागवड

देवरुख : कोकणात एसके ४ ही हळद जात चांगले उत्पन्न देणारी ठरली आहे. यामुळे शेतकरी याच जातीच्या रोपांची लागवड करतात. संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी आग्रेवाडी येथील तीन महिला बचत गटांनी २० गुंठे जमिनीत चार हजार रोपांची लागवड केली. या रोपांची चांगली काळजी घेतल्याने उत्तम दजनि वाढली आहेत.

गुहागर येथील शेतकरी सचिन कारेकर यांनी एस के ४ ही हळदीची दर्जेदार जात तयार करुन अनेक पुरस्कार मिळवले आहेत. यातच शासनाकडून संगमेश्वर तालुका अॅग्रो स्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनी लि. ला संगमेश्वरी हळद पॅटर्न प्राप्त झाला असल्याने ही कंपनी शेतकऱ्यांना हळद लागवडीला प्रोत्साहित करते. याचाच एक भाग म्हणून कंपनीने मौजे तुळसणी येथील नवनिर्वाचित श्री दत्त कृपा, श्री जुगाई आणि श्री कुलस्वामिनी या तीन महिला बचत गटांना या पिकाची माहिती दिली. यासाठीचे प्रशिक्षण देखील दिले.

या गटातील महिलांनी गावातील आग्रेवाडी याठिकाणी एस. के. ४ या जातीच्या रोपांची हळद पिकाची सामूहिक पद्धतीने सप्टेंबर महिन्यात लागवड केली. वाडीतील एकसंघ २० गुंठे जमिनीत तालुक्यातील सांगवे येथील प्रगतशील शेतकरी विलास शेलार यांनी तयार केलेल्या रोपांपैकी चार हजार रोपे कंपनीच्या माध्यमातून मिळवून लागवड केली. याची चांगली निगा या महिलांनी राखली. पिकात येणारी गवत, इतर तण बाजूला करत शेती स्वच्छ ठेवली असून, पाऊस गेल्यावरही नियमित पाणी दिले जात आहे. रोपे चांगल्या उंचीची झाली आहेत. शेती तज्ज्ञांच्या मते जेवढी या रोपांची वाढ होते तेवढेच जमिनीत हळद कंदाला फुटवे येऊन कंदाला मोठा घड तयार होतो.

या हळद लागवडीमुळे महिला शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे सल्लागार, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, आत्मा विभाग यांच्या अथक प्रयत्नातून ही लागवड यशस्वी झाली आहे.

परिसर बनला हिरवागार, उन्नतीला लागला हातभार
या बचत गटाच्या महिलांनी हळद लागवडी बरोबर सध्या २५ गुंठे जमिनीत लाल व हिरवा माठ, मुळा या भाजीपिका बरोबर कुळीथ यांचीही लागवड केली आहे. यामुळे आग्रेवाडीतील हा परिसर हिरवागार बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 13/Dec/2024