संगमेश्वर : संगमेश्वर चिपळूण परिसरातील ग्रामीण भागात अनधिकृत फेरीवाले फिरत असून, त्या फेरीवाल्यांकडे वाहनांची कोणतीही कागदपत्रे नसतानाही ते बिनधास्त खेड्यापाड्यात फिरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले म्हणून दंडात्मक कारवाई केली जाते; परंतु त्या फेरीवाल्याकडे किंवा भंगार गोळा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात नाही. याबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिपळूण येथून काहीजण दुचाकीवरून कसबा फणसवणे परिसरात महापुरुषांचे पुतळे विक्रीसाठी आले होते. त्यापैकी एका विक्रेत्याला ग्रामस्थानी थांबवले. त्या विक्रेत्याने मोटार सायकलला दोन अधिकची चाके लावून भलीमोठी ट्रॉली जोडलेली होती. त्याच्याकडे गाडीची कागदपत्रं नव्हती. गाडी परराज्यातील होती. त्याच्याकडे आधारकार्ड होते. तो अल्पवयीन असावा, असा ग्रामस्थांचा अंदाज होता. तो फेरीवाला मोठी ट्रॉली चिपळूणहून संगमेश्वर येथे घेऊन आला होता. या प्रवासात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक र ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक फेरीवाल्याने जवळच्या पोलिस ठाण्यात नोंद करणे बंधनकारक आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी फेरीचालकाला संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणले असून चौकशी सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 13/Dec/2024