मंडणगड : गायीगुरांना भुलीचे इंजेक्शन व खाद्यातून भूल देऊन पशुधनाची चोरी

मंडणगड : मंडणगड शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोलीमध्ये रात्री चारचाकी गाडीतून बसलेल्या गायीगुरांना भुलीचे इंजेक्शन व खाद्यातून भूल देऊन त्यांची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरे चोरून नेण्यावेळी चोरट्यांनी आलिशान कारचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना ६ डिसेंबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भिंगळोली ते धुत्रोली मार्गावर एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारी दाखल केल्या आहेत.

मंडणगड तालुक्यामधून काही वर्षांपासून फिरते पशुधन गायब होण्यामध्ये वाढ झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसून येणाऱ्या चित्रीकरणानुसार रात्री बाराच्या दरम्यान एक कार येऊन थांबते व रस्त्यालगत बसलेल्या गायीगुरांना त्यांचे लक्ष नसताना या गाडीतून उत्तरलेला तरुण इंजेक्शन देताना स्पष्ट दिसून येतो. घाबरून ही गायीगुरे जात असताना त्यांना थांबवण्यासाठी दुसरा हातातील पिशवीतून काही खाद्यपदार्थ फेकतो. यानंतर ही जनावरे त्याच ठिकाणी धुंद अवस्थेत बसलेली दिसून येतात. यानंतर कार बसलेल्या गायीगुरांच्या ठिकाणी लावून त्यातून उतरलेल्या व्यक्ती या गाडीमध्ये गुरे भरण्याचा प्रयत्न करतात. गुरे गाडीत भरल्यानंतर हे चोरटे त्या ठिकाणाहून पसार होताना दिसून येतात. याच ठिकाणी पहाटे चार वाजेपर्यंत हा शिरस्ता कायम राहिल्याचे दिसून येते. अंतराअंतरानंतर गाडी येऊन या रस्त्यालगत बसलेल्या गायीगुरांना गाडीमध्ये भरून पसार होताना दिसून आले.

घटनेसंदर्भात पोलिसांचा तपास सुरू असून, अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहेत. नारगोली ठिकाणी पाहणी केली असून, घडलेल्या घटनेचाही तपास सुरू आहे. – नितीन गवारे, पोलिस निरीक्षक मंडणगड

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली गाय माझी आहे. आतापर्यंत माझी तीन जनावरे गायब झाली आहेत. याबाबत पोलिसांसहित सर्व राजकीय पुढारी व्यक्तींना अवगत करत न्यायाची मागणी केली आहे. माझ्यासहीत अनेक शेतकरी न्याय मिळेल, या अपेक्षेत आहेत. – बबन जाधव, भिंगरोळी

घटनांचा परस्परसंबंध ?
घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी ७ डिसेंबरला तालुक्यातील नारगोली परिसरामध्ये शेतात जनावरांचे तुकडे रक्त पडल्याचे आढळून आल्याचे नागरिकांती पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. ६ डिसेंबरला सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार आणि ७ डिसेंबरला नारगोली परिसरामध्ये घडलेल्या घटनेचा परस्परसंबंध आहे का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 14/Dec/2024