रत्नागिरी : जयगडमधील वायू गळती: पाईपलाईनमधून गळतीचा अंदाज; प्लांटच्या सुरक्षेचे निकष तपासणार

रत्नागिरी : जयगड येथे जिंदल पोर्टजवळ गॅसचा एक छोटा प्लांट आहे. या प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस टॅंकर लावले जातात. इथेनॉल गॅस एलपीजीमध्ये मिक्स केला जातो. इथेनॉलला उग्र वास असल्यामुळे एलपीजी लीक झाल्यास ते समजावे, हा त्याचा उद्देश असतो.

जयगड येथील त्या प्लांटमध्ये गुरुवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी सुमारे दोन ग्लास भरेल एवढी एलपीजीची गळती झाल्याचे पुढे आले आहे. हा गॅस टाकीतून वाहून नेण्यासाठी अर्धा इंची पाईपलाईन आहे. त्यामधून ही गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही घटना एकाचवेळी घडलेल्या असल्यामुळे संशयाची सुई जिंदलच्या त्या प्लांटकडे जात आहे.

जिंदल पोर्टजवळ या प्लांटपासून एक रस्ता सोडल्यास लगेच जयगड माध्यमिक विद्यामंदिर आहे. दुपारी गॅसगळती झाल्यानंतर त्याच्या उग्र वासाचा शाळेतील विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला. जवळपास ६९ विद्यार्थ्यांना याचा बाधा झाली. अनेकांना मळमळू लागले, श्वसनाचा त्रास सुरू झाला, डोळ्यातून पाणी येऊ लागले. स्थानिकांनी आणि प्रशासनाने तत्परता दाखवत बाधित मुलांना उपचारासाठी कंपनीचे ऊर्जा केअर सेंटर, जयगड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये २ मुले, २० मुली एकूण २२. नवीन वॉर्डमध्ये ५ मुले, १७ मुली, १ महिला असे एकूण २३ दाखल आहेत. महिला शस्त्रक्रिया विभागात १ मुलगा, १३ मुली असे १४. अतिदक्षता विभागात १ मुलगी, खासगी परकार हॉस्पिटलला २ मुलं, ७ मुली असे ९ दाखल आहेत.

गुरुवारी दुपारी काही मुलांना बरे वाटू लागल्याने पालक त्यांना घरी घेऊन गेले होते; परंतु सायंकाळी पुन्हा त्या मुलांना त्रास होऊ लागल्याने रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात उर्वरित मुलांना दाखल केले. त्यामुळे ३४ वरून ही संख्या ६९ वर गेली आहे. प्रशासनाकडून या घटनेची प्राथमिक तपासणी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर या प्लांटमध्ये नियमित मेंटेनन्स केला जातो; मात्र गळती झाल्यामुळे त्याचा प्रभाव मानवी आरोग्यावर झाल्याची पहिलीच घटना असल्यामुळे कंपनी प्रशासनाकडूनही चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्वाची असून, अशा प्लांटच्या सुरक्षेसंदर्भातील निकषांची पूर्तता केली आहे किंवा नाही याची कसून तपासणी होणार असल्याचे समजते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 14-12-2024