राजापूर : तालुक्यातील पाचल परिसरातील प्रवासी, विद्यार्थीसंख्येचा विचार करून रत्नागिरी- आजीवली आणि बोरिवली-आजीवली या दोन्ही एसटी प्रवासी बस लांजा आगारातून सोडण्यात यावी, अशी मागणी माहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती शरद मोरे यांनी दिली.
शरद मोरे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांची भेट घेऊन राजापूर तालुक्यातील एसटी प्रवासी आणि विद्यार्थी यांचे होणारे हाल याची माहिती देऊन पाचल परिसरातील प्रवाशांना एसटी प्रवास सुलभ व्हावा यासाठी सांजा आगारातून रत्नागिरी-आजीवली, बोरिवली-आजीवली एसटी सोडण्याची मागणी लेखी निवेदनाने केली आहे.
रत्नागिरी आजीवली अनेक वर्ष लांजा आगारातून सोडण्यात येत होती; मात्र, कोरोना काळात लांजा आगाराने रत्नागिरी आजीवली एसटी बंद केली होती. त्यामुळे राजापूर आगाराने रत्नागिरी आजीवली एसटी सुरू केली ती पुढे कायम ठेवली. रत्नागिरी-आजीवली, राजापूर आगाराने कायम ठेवली; मात्र संध्याकाळी सुटणारी राजापूर-आजीवली एसटी फेरी अनिश्चित केली. रत्नागिरी-आजीवली, ही रत्नागिरीतून ३.२० वा. सुटते आणि पाचलला ५.४५ वा. येते. पाचल वरून ६.२० ला सुटते ती बस आजीवली येथे पोहोचण्यासाठी रात्रीचे ८ वाजतात. ११.३० ते संध्याकाळी ६.२० या कालावधीत कोणतीही प्रवासी वाहतूक नसल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना रत्नागिरी आजीवली एसटीवर अवलंबून राहावे लागते.
जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आजीवली बोरिवली बंद करून राजापूर-आजीवली सुरू केली; मात्र ही फेरी अनियमित आहे. पाचल परिसरातील ४० विद्यार्थी आहेत; परंतु राजापूर-आजीवली एसटी अनियमित असल्याने विद्यार्थांना रत्नागिरी-आजीवली, गाडीवर अवलंबून राहावे लागते. राजापूर-बोरिवली फेरी बंद केल्यानंतर लांजा आगाराने बोरिवली-पाचल एसटी सुरू केली. हीच गाडी आजीवलीपर्यंत पुढे न्यावी, अशी मागणी लांजा आगार व्यवस्थापकांकडे केली; परंतु रत्नागिरी-आजीवली एसटी प्रथम आम्हाला दिली तरच बोरिवली-आजीवली एसटीचा विचार करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे रत्नागिरी-आजीवली ही गाडी लांजा आगाराकडे द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल, लांजा आगारातून दुपारी २ वा. लांजा-आजीवली सुटली की, ती पाचलला तीन वाजता येईल आणि ती ३ वा. पाचलवरून आजीवलीसाठी जाईल. आजीवली-बोरिवली म्हणून ४ वा. सुटेल. त्यामुळे बोरिवली-आजीवली एसटीचा फायदा प्रवासी आणि विद्यार्थ्यांना होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 14/Dec/2024














